Retired Army Chief General Manoj Naravane amid the political storm triggered by excerpts from his unpublished book questioning India’s national security decisions. Sarkarnama
मुंबई

Shivsena UBT : 'अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून गांधींनी मोदी, राजनाथ सिंह अन् तथाकथित 'जेम्स बॉण्ड' अजित डोवाल यांची पळता भुई थोडी केली...'

Manoj Naravane Book Row : 'इतका मोठा निर्णय सैन्यावर सोपवून पंतप्रधान चिनी सैन्याबरोबर युद्ध करण्याचा किंवा टाळण्याच्या निर्णयाची जबाबदारी झटकून मोकळे झाले.’’ जनरल नरवणे यांनी राजकीय नेतृत्वाची क्षमता आणि इतर सगळ्याच बाबतीत मुखवटा फाडला. पंतप्रधानांच्या 56 इंच छातीचा बुडबुडाही या प्रकरणात फुटला.'

Jagdish Patil

Mumbai News, 04 Feb : निवृत्त लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून सध्या देशातील राजकारण तापलं आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हे प्रकरण लावून धरल्यामुळे संसदेत देखील मोठा मोठा गदारोळ झाला. आता याच सर्व प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

सामनात लिहिलं की, 'मोदी काळात लोकशाही व विरोधी पक्षांचे पूर्ण पतन झाले, तरीही राहुल गांधींसारखे नेते पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारचे वस्त्रहरण करण्याचे काही थांबवत नाहीत. निवृत्त लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील मजकुरावरून गांधी यांनी पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह व तथाकथित ‘जेम्स बॉण्ड’ अजित डोवाल यांची पळता भुई थोडी केली आहे.

सध्याचे सरकार देशाच्या सीमा व राष्ट्रीय सुरक्षेबाबत किती भेदरट आहे, हे गांधी यांनी लोकसभेत दाखवून दिले. राष्ट्रावर परचक्राचे संकट येते तेव्हा देशाचे नेतृत्व निर्णय घेण्यास सक्षम नाही, हे जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील मजकुरावरून स्पष्ट दिसते. 31 ऑगस्ट, 2020 च्या रात्री चिनी टँक्स पीपल लिबरेशन आर्मीसह भारतीय सीमेच्या दिशेने पुढे येत होते व त्यांचा इरादा नेक नव्हता.

जनरल नरवणे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी संपर्क केला. ‘‘माझ्यासाठी काय आदेश?’’ अशी विचारणा केली. राजनाथ यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून आदेश घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा, ‘‘जो उचित समझो वो करो’’ असे सांगून संभाषण तोडले. नरवणे यांचे म्हणणे आहे, ‘‘हे चमत्कारिक आहे. कोणतीही आकस्मिक योजना नव्हती. चिनी सैन्याला रोखण्याचा उपाय नव्हता.

इतका मोठा निर्णय सैन्यावर सोपवून पंतप्रधान चिनी सैन्याबरोबर युद्ध करण्याचा किंवा टाळण्याच्या निर्णयाची जबाबदारी झटकून मोकळे झाले.’’ जनरल नरवणे यांनी राजकीय नेतृत्वाची क्षमता आणि इतर सगळ्याच बाबतीत मुखवटा फाडला. पंतप्रधानांच्या 56 इंच छातीचा बुडबुडाही या प्रकरणात फुटला,' अशा शब्दात सामानातून मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

दरम्यान, हे सारे प्रकरणराहुल गांधी यांनी संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना बोलू दिले गेले नाही व लोकसभा दिवसभरासाठी बंद करून पंतप्रधान, संरक्षणमंत्री निघून गेले. भारतीय नेतृत्व चीनशी सामना करण्यास घाबरते काय? चीनने भारतीय सीमांवर कुरापती सुरूच ठेवल्या. ईशान्येतील ‘तवांग’ वगैरे भागात त्यांची घुसखोरी सुरूच आहे.

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात 26 हिंदू पर्यटकांचे प्राण गेले. त्यानंतर सुरू केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चाही याच नेतृत्वाने विचका केला. पहलगामचा बदला पूर्ण होण्याआधीच भारतीय सैन्याला माघार घ्यायला लावणाऱ्या नेतृत्वाकडून आणखी काय अपेक्षा करणार? ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या आपल्या आत्मकथेत जनरल नरवणे यांनी बरेच स्फोट घडवले आहेत, पण सरकारने हे पुस्तक प्रसिद्ध करण्यावर बंदी घातली आहे. तरीही या पुस्तकातला राष्ट्रीय हिताचा भाग समोर यायचा थांबला नाही.

भारताला खरा धोका पाकिस्तानपासून नसून चीनपासून आहे, पण कमजोर पाकिस्तानवर दादागिरी करायची व चीनसमोर गुडघे टेकायचे हे एकंदरीत मोदी सरकारचे धोरण आहे. दिल्लीत जाहीर सभेत डरकाळ्या फोडायच्या आणि समोर संकट येताच उंदरासारखे बिळात शिरणाऱ्या नेतृत्वाचा ‘उदो उदो’ करणे हा खरा राष्ट्रद्रोह आहे. असे असंख्य राष्ट्रद्रोही अंधभक्त जनरल मनोज नरवणे यांना आता शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात करतील.

आम्हाला आता चिंता वाटते ती जनरल नरवणे यांच्या सुरक्षेची. पुण्यातील रस्त्यावर आम्ही जनरल अरुण कुमार वैद्य यांच्यासारखा मोहरा गमावला तो अतिरेक्यांकडून. जनरल नरवणे यांना धोका निर्माण होऊ शकतो तो गोडसेवादी अंधभक्तांकडून. प्रे. ट्रम्प यांच्या तालावर नाचणारे चीनचे संकट येताच निर्णय घेत नाहीत व सैन्याला वाऱ्यावर सोडतात.

चिनी सैन्यावर गोळी झाडू नका ही सरकारची भूमिका होती. तेच सैन्य भारतावर चाल करून आले तेव्हा आपले नेतृत्व निर्णय घेऊ शकले नाही. लाल बहादूर शास्त्रींचा नारा होता, ‘जय जवान, जय किसान.’ पंतप्रधान मोदींची गर्जना आहे, ‘जो उचित हो वो करो.’ याचा अर्थ काय समजायचा? मोदींचा ‘मास्टर स्ट्रोक’ दुसरे काय? असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेने मोदींच्या नेतृत्वावर टोलेबाजी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT