Eknath Shinde, Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Maratha Aarakshan Mumbai Morcha : मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीत काय ठरलं?

Jui Jadhav

Mumbai Political News :

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या लढाईतील शेवटच्या टप्प्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आता मुंबईकडे कूच केले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'वर्षा'वर बैठक घेतली. या बैठकीमधून नेमके काय साध्य झाले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

या बैठकीत न्या. शिंदे समितीत आणखी दोन निवृत्त IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अपेक्षित वेळेत अहवाल येत नसल्याने शिंदे समितीने नाराजी व्यक्त केली गेली आहे. दोन निवृत्त अधिकाऱ्यांना नियुक्त करून त्यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवालाचा पाठपुरावा केला जाणार आहे. दरम्यान, 70 टक्के कुणबी नोंदी आतापर्यंत सापडल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आजच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल आणि आढावा घेतला. काही ठिकाणी नोंदी सापडत नसल्याचेही समोर आले आहे. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

मराठा समाजाचे सामाजिक (Maratha Reservation), आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याचे कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्वेविषयी कळू द्या असे निर्देशही त्यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्वेक्षणासाठी प्रशिक्षण

गोखले इन्स्टिट्यूटचे अजित रानडे (Ajit Ranade) यांनी यावेळी सर्वेक्षणाबाबत माहिती दिली. शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, तलाठी असे सव्वा लाखाहून अधिक प्रगणक यांना आठ दिवसांत काम पूर्ण करायचे आहे. यासाठी 36 जिल्हे, 27 नगरपालिका, 7 कॅन्टोनमेंट क्षेत्रात आजपासून प्रशिक्षण सुरू झाले आहे.

वंशावळीसाठी समिती

कुणबी नोंदीबाबत वंशावळी जुळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी नोंदीची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी बार्टी तसेच इतर सक्षम संस्थेच्या तज्ज्ञांचे पथक तातडीने नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले. या पथकात मोडी भाषा तज्ज्ञ, तहसीलदार यांचा समावेश करा. ज्या गावांत अत्यल्प नोंदी सापडल्या आहेत तिथे परत खातरजमा करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT