Maratha Aarakshan Mumbai Protest : मराठा आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळालेच पाहिजे, यासाठी शनिवारी मुंबईच्या दिशेने प्रचंड मोर्चासह निघालेले मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यात कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. परिणामी नाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जरांगे यांच्याशी चर्चेचे दरवाजे जवळपास बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
शिंदेंच्या या निर्णयाला सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या मंत्र्यांचे एकमत झाल्याचे माहिती आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना जरांगे आपलाच हेका कायम ठेवत असतील तर त्यांच्याशी बोलून काय फायदा? असा प्रश्नही सरकारमधील काही मंत्र्यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जरांगे मात्र आपल्या मागण्या बदलत असल्याने त्यांच्याशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, असे एका मंत्र्यांने नाव सांगण्याच्या अटीवर ‘सरकारनामा’शी बोलताना माहिती दिली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मागील काही दिवसांपासून सरकार आणि जरांगे यांच्या सतत चर्चा सुरू आहे.
मनोज जरांगे यांच्याकडून सांगण्यात येत असलेल्या बहुतांश मागण्या सरकारमधील मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी पूर्ण करत आहे. त्याबाबतीत सकारात्मक असतानाही जरांगे मुंबईतील आंदोलनावर ठाम आहे. जरांगे अशीच भूमिका घेणार असतील तर त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आम्ही जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काही मंत्र्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठा आरक्षणावर मार्ग निघावा, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतत मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाठवत आहे. मराठा कुणबी नोंदी शोधल्या जात आहे. हवे ते सर्व प्रयत्न केले जात आहे. मात्र, निर्णयासाठी काही वेळ लागू शकतो आणि हे मान्य केले पाहिजे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मोर्चा काढावा, मुंबईला यावे, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, काम कुठे थांबला आहे का, हे देखील स्पष्ट करावे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आग्रही आहेत. मात्र जरांगे मोर्चा काढणार असतील तर सरकारसुद्धा आता मागे हटणार नाही, अशी भूमिका बहुतांशी मंत्र्यांची आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अंतरवाली सराटीतून (Antarwali Sarati) जरांगेंनी सरकारवर सडकून टीका केली. आंदोलकांवर गुन्हे दाखल करणे, नोटीसा पाठवणे एवढेच काम सरकारकडे उरले आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहनही जरांगेंनी केले. तसेच सरकारच्या चर्चा न करण्याच्या भूमिकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले.
जरांगे आपल्या मागण्या दररोज बदलत असल्याचा आरोप काही मंत्र्यांनी केला. त्यामुळे यापुढे जरांगे यांच्यासोबत कुणीही चर्चा करू नका, त्यांना मुंबईत आंदोलन करू द्या, अशी मंत्र्यांची भूमिका असल्याची माहिती आहे. यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘सरकारकडून चर्चेचे दार बंद केले जात असतील, तर आमच्याकडूनही चर्चेचे दार आजपासून बंद झाली आहे. त्यांना काय करायचं करू द्या, आता आम्ही देखील चर्चा करत नाही. त्यांना आमच्या लेकरांचा जीव घ्यायचाच असेल, तर मग आम्ही देखील चर्चा करत नाही आणि मुंबईत आंदोलन करणार आहे,' असं जरांगे म्हणाले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.