Manoj Jarange Patil Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : मनोज जरांगे- पाटलांच्या आंदोलनासाठी मुंबईत 'या' तीन मैदानांची पाहणी

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai News : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसीमधून आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जरांगे-पाटील यांच्या समर्थकांकडून पत्रव्यवहार आणि पाहणी सुरू करण्यात आली आहे. (Maratha Reservation : Inspection of three grounds in Mumbai for Manoj Jarange Patil's agitation)

मनोज जरांगे-पाटील हे 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यासाठी मुंबईतील समन्वयकांकडून मैदान आणि इतर सुविधांसंदर्भात पाहणी सुरू करण्यात आली आहे. आंदोलनासाठी मुंबईतील प्रामुख्याने 3 मैदाने त्यांनी निवडली आहेत. आझाद मैदान, छत्रपती शिवाजीमहाराज पार्क मैदान आणि बीकेसी वांद्रे मैदानासाठी परवानगी मागण्यात आलेली आहे. या तीन मैदानांपैकी ज्या मैदानाची परवानगी मिळेल, त्या मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, असा दावा मराठा समन्वय समितीमधील काही नेत्यांनी केला आहे. मात्र, 20 तारखेला मुंबईत येणार, असा निर्धार जरांगे-पाटील यांनी केला आहे. जरांगे-पाटील यांनी मुंबईत येण्यापूर्वी सरकार कोणता निर्णय घेते का, हे पाहावे लागेल.

मुंबईत मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील हे येत्या २० जानेवारीपासून मुंबईत आरपारची लढाई लढणार आहेत. मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गामधून (ओबीसी) आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे-पाटील यांची आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, मनोज जरांगे-पाटील हे मुंबईत आंदोलन करणार आहेत, त्याच वेळी ओबीसी समाजही मुंबईत आंदोलन करणार असल्याचे सांगितले जात आहे. ओबीसी समाजाला धक्का लागता कामा नये आणि ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी या समाजातील नेत्यांनी केली आहे. त्यामुळे जर मराठा समाज आंदोलन करणार असेल, तर आम्हीही आंदोलन करू, असं ओबीसीनेत्यांचं म्हणणं आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT