Mumbai News : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. दरम्यान, राज्यात बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासंदर्भात आज सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीयांचे एकमत झालेले आहे, तर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याबाबतही सर्वपक्षीयांनी आवाहन केले आहे. (Latest Marathi News)
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एक ठराव पास केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सर्व पक्षांची सहमती नोंदवली गेली. तसेच, मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, असा सर्वपक्षीय नेत्यांनी ठराव समंत केला. यामुळे आता मनोज जरांगेची भूमिका काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या काही कायदेशीर त्रुटी आहेत, त्या काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली आहे. राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली आहे. यामुळे थोडा संयम बाळगावा आणि सरकारला वेळ द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांतदादा पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित जयंत पाटील, नाना पटोले, सुनील तटकरे, अनिल परब, सुनील प्रभू, आशिष शेलार, राजेश टोपे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, बच्चू कडू, शेकापचे जयंत पाटील, राजू पाटील, कपिल पाटील, सदाभाऊ खोत, राजेंद्र गवई, डॉ. प्रशांत इंगळे, कुमार सुशील, बाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित आहेत. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिक, सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.