MSRTC
MSRTC Sarkarnama
मुंबई

एसटी संपात मोठी फूट; 19 हजारांहून अधिक कर्मचारी रुजू

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या महिनाभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरू आहे. राज्य सरकारने (Mahavikas Aghadi) भरघोस पगारवाढ देऊनही हजारो कर्मचाऱ्यांनी अद्यापही आंदोनलाचाच पवित्रा घेतला आहे. भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी आंदोलनातून माघार घेतली आहे. तसेच एसटी महामंडळाकडूनही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यानंतर आता संपात फूट पडली असून सोमवारपर्यंत 19 हजारांहून अधिक कर्मचारी रुजू झाले आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कामगारांनी महिनाभरापासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सुरूवातीला राज्यभरात एकही एसटी बस मार्गावर धावत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारला खासगी वाहनांना सार्वजनिक वाहतुकीची परवानगी द्यावी लागली. पडळकर आणि खोत यांनी या आंदोलनात उडी घेतल्याने कामगारांचं मनोबल अधिकच वाढलं.

उच्च न्यायालयाने विलीनीकरणासाठी समिती सांगितल्यानंतर राज्य सरकारने समितीही स्थापन केली. समितीचा जो निर्णय़ असेल, तो मान्य केला जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब सुरूवातीपासून सांगत आहेत. त्यानंतर कर्मचाऱ्यांना भरघोस पगारवाढही देण्यात आली. पण त्यानंतरही कामगार आंदोलनावर ठाम आहे. अखेर या आंदोलनात खोत व पडळकर यांनीही माघार घेतली. त्यानंतर महामंडळाने कारवाईचा वेग वाढवला आहे.

दरम्यानच्या काळात काही कर्मचारी कामावर हजर होत होते. पण प्रमाण नगण्य होते. पण पगारवाढ व कारवाईच्या बडग्यामुळे आता हे प्रमाण वाढू लागले असून शुक्रवारी 19 हजारांहून अधिक कर्मचारी हजर होते. त्यामध्ये सुमारे अडीच हजार चालक व 2200 वाहकांचा समावेश आहे. त्यामुळे आता हळू हळू एसटी वाहतूक मार्गावर येऊ लागली आहे. कामगारांमध्ये आता फूट पडू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, रविवारपर्यंत महामंडलाने सुमारे साडे सहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तर दीड हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कठोर कारवाईमुळेही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याची चर्चा आहे. तसेच भरघोस पगारवाढ हेही त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

सोमवारपर्यंत कामावर हजर झालेले कर्मचारी (कंसात एकूण कर्मचारी)-

प्रशासकीय - 8,922 (9,426)

कार्यशाळा - 5,442 (17,560)

चालक - 2,549 (37,225)

वाहक - 2,250 (28,055)

एकूण - 19,163 (92,266)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT