Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad : आव्हाडांसाठी मुघल अन् अफझलखान हेच देव; श्रीराम कोण होते, ते त्यांना ज्ञात नसावे...

Maharashtra Politics : ते मुघलांबद्दल चांगले सांगतील...

शर्मिला वाळुंज

Dombivli News : "प्रभू श्रीराम मांसाहारी होते," असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी शिबिरात बुधवारी केले होते. यानंतर राज्यभरात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आंदोलन सुरू आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात घाटकोपरमध्ये पोलिसात तक्रार दाखल केली आहे. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी आव्हाडांना सुनावले आहे. "मुघल आणि अफझलखान त्यांच्यासाठी देव आहेत. बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहिती नाही. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्र कोण होते हे त्यांना ज्ञात नसावे," असे गायकवाड म्हणाले आहेत.

आव्हाडांच्या या वादग्रस्त विधानाचा राज्यातून निषेध केला जात आहे. गणपत गायकवाड यांनीदेखील आव्हाडांवर सडकून टीका केली आहे. आमदार गायकवाड म्हणाले, "खरंतर आव्हाड यांना देशाचे साधुसंत, देव किंवा देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्याबद्दल विचारायचं नाही. त्यांचा इतिहास त्यांना माहिती नाही. त्यांना फक्त मुघलांचा आणि अफझलखानाचा इतिहास विचारायचा. आणि ते मुघलांबद्दल चांगले सांगतील. मुघल आणि अफझलखान त्यांच्यासाठी देव आहेत. बाकी हिंदू देवतांचा इतिहास त्यांना माहिती नाही आणि ते पूजा करीत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रभू रामचंद्र कोण होते, हे त्यांना ज्ञात नसावे.

श्रीरामाबाबात केलेल्या वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी अनेक वेळा महाराष्ट्राला संबोधित करीत असतो. मी कधीही इतिहासाचा विपर्यास करीत नाही. इतिहासाचे विकृतीकरण करणे हे माझे काम नाही. पण काल मी जे बोललो, ते ओघात बोलून गेलो. राम, श्री रामाला आम्हा महाराष्ट्रात राम कृष्ण हरी म्हणतो, जो पांडुरंग आहे तोच राम आहे. श्री रामाबद्दल बोलत असताना मी म्हटले, ते मांसाहारी होते, मला हा वाद वाढवायचा नाही. पण जे वक्तव्याविरोधात उभे राहिले आहे. त्या सर्वांना माहितीसाठी सांगतो की, वाल्मीकी रामायणामध्ये सात काण्ड आहेत. यात बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किंधाकाण्ड, सुंदरकाण्ड, युद्धकाण्ड आणि उत्तरकाण्ड आहेत. यात अयोध्याकाण्डातील सर्ग 52 श्लोक 102 जो आहे. तो मी वाचून दाखवत नाही, कारण मला वाद वाढवायचा नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

आव्हाड म्हणाले, “मी अभ्यासाशिवाय कोणतेही भाष्य केले नाही. आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.”

'आज तुमच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत? या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मी बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा कार्यकर्ता आहे. मला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे. मी गुन्ह्याला घाबरत नाही. तुम्हाला माझ्याशी लॉजिकली बोलायचे असेल तर या. लॉजिक मान्य नसल्यामुळे मी खेद व्यक्त करत आहे,” असे आव्हाड म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT