Jitendra Awhad  Sarkarnama
मुंबई

Jitendra Awhad On Adivasi : आदिवासींच्या शुद्धीवरून आव्हाडांच्या शब्दांना 'चढलेली' धार सत्ताधाऱ्यांनी क्षणात 'उतरवली !'

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : विरोधकांवर शाब्दिक प्रहार करणारे राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड गुरूवारी विधानसभेत वादग्रस्त विधान करून फसले आणि नव्या वादात अडकले. बिल्डर आणि आदिवासींमधील जमीन खरेदी -विक्रीचे व्यवहार मांडताना आव्हाडांनी 'दारु'चा संबंध जोडला. हे व्यवहार रात्रीच होतात आणि तेव्हा आदिवासी बांधव शुध्दीत नसल्याचे आव्हाडांनी सांगितले. या बोलण्याने विरोधकांच्या हाती आयते कोलित पडले. हा विषय भडकला. त्याच्या झळा बसताच जितेंद्र आव्हाडांना उपरती झाली आणि माफीही मागितली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी विधानसभेच्या सभागृहात आदिवासी जमिनींच्या बळकावण्याच्या मुद्द्यांवरुन सरकारवर आगपाखड केली. मात्र, टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह विधान केले. मात्र, आमदार आव्हाड यांच्या एका विधानावरून सत्ताधारी आमदारांनी तीव्र आक्षेप घेतला. आव्हाड म्हणाले, आदिवासी जमिनींच्या विक्रीचा प्रकार घडतोय. बिचारे गरीब, अज्ञानी असतात. काहीतरी लिहून देतात. रात्रीचा त्यांचा कार्यक्रम झाला की ते शुद्धीतच नसतात. त्यामुळे त्यांची फसवणूक होते, ती अक्षम्य आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणाले...?

आदिवासी बांधवांच्या जमिनींची किंमत हजारो कोटींच्या घरात असते. त्यावर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का? असं त्यांना विचारलं जातं. तो आदिवासी कुडाच्या झोपडीत राहतो. ती संपूर्ण जमीन त्याच्या ताब्यात. पण तहसीलदार त्याच्याकडे पुरावा मागतो. तो पुरावा आणायला गेला की ५-६ वर्षं लागतात. तोपर्यंत जमिनीवर कब्जा घेऊन प्लॅन पास होऊन खड्डे मारलेले असतात. बांधकाम उभं राहिलेलं असतं अशा शब्दांत आव्हाडांनी वास्तव चित्रण मांडलं.

विधानसभेत(Monsoon Session) जितेंद्र आव्हाडांनी आदिवासी बांधवांच्या जमीन खरेदी - विक्रीबाबत काढलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सभागृहात सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी आव्हाडांवर तीव्र आक्षेप घेत खडेबोल सुनावले. तसेच आदिवासी समाजाची माणसं रात्री शुद्धीत नसतात. कृपया असे शब्द वापरू नयेत. कारण आदिवासी समाज सुसंस्कृत समाज आहे. अशा समाजाला बदनाम करणं चुकीचं आहे. हे रेकॉर्डवरून काढलं जावं. आव्हाडांनी देखील आपल्याकडून एखादा शब्द चुकीचा गेला असेल, तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत या उद्भवलेल्या वादाला पूर्णविराम दिला.

सभागृहात काय घडलं...?

मुंबई(Mumbai)त दोन-तीन हजार कोटींच्या आदिवासींच्या जमिनी आहेत. मोठ्या बिल्डर्सनी त्या गिळंकृत केल्या. ठाण्यातही आहेत. आदिवासी समाज बिचारा तहसीलदाराकडे गेला की, त्याला टेस्ट क्रिकेटच खेळायला लावतात. बिल्डर आला की ट्वेंटी-२० चालू असते. आदिवासी जमिनी, महार वतनाच्या जमिनी सर्रास खाल्ल्या जातात. आदिवासींच्या बाबतीत न्याय मागायचाच नाही असंच चित्र कायम पाहायला मिळते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

किती वर्षं बिल्डरांना संरक्षण देणार?

आदिवासी बांधवांकडील जमिनी ह्या त्यांच्याकडे पारंपरिकरित्या आहेत, त्यांच्या चार पिढ्या या जमिनीत राहिल्या आहेत. त्यांचा योग्य तो विचार करून, सातबारावर त्यांचं नाव घेऊन ती जमीन त्यांच्या मालकीची आहे. हे पाहून सगळे व्यवहार गरीब आदिवासींबरोबर करावेत असा कायदा वगैरे करून तुम्ही त्या आदिवासीला न्याय देऊ शकणार आहात का आणि या आदिवासी माणसाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपण किती वर्षं इथल्या धनाढ्य बिल्डरांना संरक्षण देणार आहात? असा संतप्त सवाल करून आव्हाडांनी सभागृहात आवाज उठवला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT