मुंबई : शिवसेनेतील फुटिर आमदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना आणि बंडखोरांना भावनिक साद घातल्यानंतरही मुंबईतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील दोन आमदार संध्याकाळ नंतर नाॅट रिचेबल झाले. ते दोघेही इतर बंडखोर आमदारांच्या गोटात सहभागी होण्यासाठी गुवाहटीला निघाल्याचे सांगण्यात आले. आज एकूण सात आमदारांची भर पडल्याने शिंदे गटाची संख्या 41 पर्यंत पोहोचली आहे. (Eknath Shinde latest news)
दादर-माहिम या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि कुर्ला मतदारसंघाचे आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांनी एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या दोघांनीही काल बंडखोर आमदारांवर टीका केली होती. शिवसेनेने विधीमंडळाचे नवीन गटनेते म्हणून अजय चौधरी यांची निवड केली. त्या वेळी देखील उपस्थित होते. ठाकरे यांनी आज भावनिक आवाहन करत माझे काय चुकले, असा सवाल केला. त्याचाही परिणाम या दोघांवर झाला नाही. दोघांनीही आता गुवाहटिचा रस्ता धरला आहे.
याबाबत कुडाळकर यांनी आपण गुवाहटीला जाणार असल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. आज सकाळपर्यंत माझा विचार गुवाहटिला जाण्याचा नव्हता, मात्र काही कारणाने जावे लागत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. कुडाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते, त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सरवणकर हे देखील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांचेही बंडखोर गटाला जाऊन मिळणे, हे शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
आज सकाळपासून तब्बल सात आमदार हे शिंदे यांच्याकडे गेले. त्यात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, योगेश कदम या सेनेच्या तीन आमदारांचा समावेश आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित या दोन अपक्ष आमदारांनीही गुवाहटी गाठली. हे पाच आमदार गुहावटीला पोहोचण्याच्या बातम्या येत असतानाच सरवणकर आणि कुडाळकर यांनी सुरतमार्गे गुवाहटीला निघाल्याचे वृत्त झळकले.
याशिवाय कृषीमंत्री दादाजी भुसे आणि आमदार दीपक केसरकर हे देखील पुढील चोवीस तासांत शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केसरकर यांनी तर आपण मनाने एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले. भुसे हे सध्या ठाकरे यांच्यासोबत असले तरी ते शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. ते पण गुवाहटिला गेल्यास आश्चर्य नको, अशी परिस्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.