MLA’s son Rohit Gavit was taken into police custody following an alleged assault incident at a hospital sarkarnama
मुंबई

Rohit Gavit : मोठी बातमी! आमदारपुत्र रोहित गावीत पोलिसांच्या ताब्यात, गोविंदा पथकातील १२ जणांना अटक; रुग्णालय राडा भोवला

Palgar Hospital Assault Case : पालघरमधील रुग्णालयात राडा केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आमदार राजेंद्र गावीत यांचे पुत्र रोहित यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

निखिल मेस्त्री

Palgar News : पालघरमधील रिलीफ हॉस्पिटलमधील राडा प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गोविंदा पथकातील तब्बल १२ जणांना अटक केली आहे. या सर्वांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सुजाता बांदल यांच्यासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी आमदारपुत्र रोहित राजेंद्र गावीत आणि निलंबित युवासेना प्रमुख साईराज पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.रुग्णालयातील राड्यापासून सुरू झालेल्या या प्रकरणात आता अटक, अटकवॉरंट, जामीन अर्ज आणि तपास अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे.

५ ते ६ सप्टेंबरच्या मध्यरात्री दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदा पथकातील सदस्यांवर रिलीफ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याचवेळी काही शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयात घुसल्याचा आरोप आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केल्याचा तसेच रुग्णालयातील कर्मचारी विवेक झिंगा यांना मारहाण केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल झाली. त्यानंतर पालघर पोलिसांनी एकूण १७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात सर्वप्रथम पोलिसांच्या हाती लागलेला शिवसेनेचा निलंबित शहरप्रमुख राहुल घरत सध्या पोलीस कोठडीत आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्याला यापूर्वी तीन वेळा पोलीस कोठडी सुनावली असून १३ सप्टेंबरपर्यंत त्याची कोठडी कायम आहे. तपासादरम्यान पोलिसांनी रुग्णालयातील राड्यात प्रत्यक्ष सहभागी असल्याचा संशय असलेल्या गोविंदा पथकातील सदस्यांची माहिती घेतली. त्यातून शुक्रवारी १२ जणांना अटक करण्यात आली.

एफआयआरमध्ये नावे असलेल्या राहुल घरत यांच्याव्यतिरिक्त नऊ जणांविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे अद्याप पोलिसांच्या हाती न लागलेल्या आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांकडून त्यांच्या शोधासाठी हालचाली सुरू आहेत.

या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी कुंदन संखे, शुभम बांदिवडेकर आणि नगरसेवक नीलम संखे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी गुरुवारी याच न्यायालयाने साईराज पाटील, राहुल संखे आणि मनीष ऊर्फ विकी संखे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते.

तपास अधिकाऱ्यांची तीनदा बदली

रुग्णालयातील राडा प्रकरणाचा तपासही चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात आतापर्यंत तीन वेळा तपास अधिकारी बदलण्यात आले आहेत. सुरुवातीला पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर यांच्याकडे तपास होता. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास पालघरचे पोलीस उपअधीक्षक उमेश गवळी यांच्याकडे सोपविण्यात आला. पुढे हा तपास डहाणूच्या पोलीस उपअधीक्षक निशा जाधव यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून सध्या त्या तपास अधिकारी आहेत.

सात अनोळखींचा आकडा 12

गुन्हा दाखल करताना शिवसेना पदाधिकाऱ्यांसह सात अनोळखी व्यक्तींचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र तपास पुढे सरकताच पोलिसांनी या सात जणांच्या संख्येपेक्षा अधिक जणांचा सहभाग समोर आणत १२ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण गोविंदा पथकातील सदस्य असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यातील एक जण विरार-नारंगी परिसरातील, एक पालघर तालुक्यातील, तर सात जण डहाणू तालुक्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT