Sunil Shelke  Sarkarnama
मुंबई

MLA Sunil Shelke In Session : 'इर्शाळवाडी'नंतर मावळातील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर; आमदार शेळके सभागृहात गरजले

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : पावसाळ्यात दरड कोसळून दुर्घटना होतात.त्यानंतर सरकारकडून मदतकार्य व पुर्नवसन केले जाते. पण, या दुर्घटना होऊच नयेत यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करा अशी नेमकी मागणी दरडग्रस्त अनेक गावे असलेल्या मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

अतिवृष्टीमुळे भुस्खलन होऊन रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी(Irshalwadi)वर नुकतीच (ता.१९) दरड कोसळून मोठी जीवितहानी झाली. त्याअगोदर जुलैतच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यात माळीण गावावर डोंगरकडा कोसळून त्याखाली संपूर्ण गाव दबले गेले होते. अशी तब्बल २३ दरडग्रस्त गावे डोंगरी तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीत मावळमध्ये आहेत.

त्यातील आठ गावे ही,तर भुस्खलनचा मोठा धोका असल्याने अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे तेथे इर्शाळवाडीची पुनरावृत्ती होऊ न देण्यासाठी अगोदरच प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी आमदार सुनील शेळके(Sunil Shelke) यांनी सभागृहात केली.

मावळ(Maval)च नाही,तर संपूर्ण राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा अशा या मुद्यावर ते गांभीर्याने बोलत असताना अध्यक्षांनी,मात्र त्यांना लगेचच आपले बोलणे आटोपते घेण्यास सांगितले. माळीण दुर्घटनेनंतर राज्य सरकारने दरडग्रस्त गावांचा सर्व्हे केला होता. त्यात मावळ तालुक्यातील भुशी,बोरज,ताजे, गभाले वाडी, मोरमारेवाडी, माऊ, तुंग,मालेवाडी, लोहगड,पाले ना.मा.,नायगाव, साई, वाउंड,कल्हाट, सावळा, टाकवे खु.,शिलाटणे, सांगिसे,नेसावे आदी २३ गावे धोकादाय़क आढळली होती.

त्यातील बोरज,माऊ,भुशी, कळकराई,मालेवाडी,तुंग, लोहगड आणि ताजे ही आठ गावे अतिसंवेदनशील असल्याचे दिसून आले होते. अशा गावांत दुर्घटना झाल्यावर सरकारकडून नुकसानग्रस्त कुटुंबांना भरपाई देण्यात येते. तेथील वाडी-वस्तीचे, गावाचे पुनर्वसन करण्यासाठी प्रस्ताव तयार होतो. परंतू,या दुर्घटना होऊ नये यासाठी आधीच पावले उचलण्याची गरज आहे.त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता हा धोका गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे,असे आमदार शेळके यांनी सभागृहात सांगितले.

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर मावळातील संवेदनशील गावांमधील भूस्खलनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेथील रहिवाशी भीतीच्या छायेखाली आहेत.दरवर्षी पावसाळ्यात सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावयाच्या सूचना त्यांना प्रशासनाकडून देण्यात येतात.परंतु यावर योग्य निर्णय घेऊन कायमचा तोडगा काढला गेला पाहिजे,असे ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT