Pimpri-Chinchwad: पवना जलवाहिनीचा मुद्दा विधानसभेत वाजला; भाजपच्याच आजी-माजी आमदारांमध्ये वादाची ठिणगी ?

Pune BJP News: पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरु करण्याची महेश लांडगेंची विधानसभेत मागणी, मात्र भाजपचेच माजी मंत्री बाळा भेगडेंचा बाहेर विरोध कायम
Mahesh Landge and Bala Bhegade
Mahesh Landge and Bala BhegadeSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत सुरु असून त्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची विधानसभेत बॅटिंग सुरुच आहे. १४ वर्षापूर्वी बंद पडलेली पिंपरी-चिंचवड महापालिकेची बंद जलवाहिनी योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी त्यांनी गुरुवारी केली. मात्र, त्याला भाजपचेच मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांचा विरोध कायम असून `सरकारनामा`शी बोलताना आज त्यांनी तो पुन्हा बोलून दाखवला.

आमदार लांडगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एकदम 'गुड बुक'मधील आहेत. भेगडे हे देखील फडणवीसांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे फडणवीस कोणाच्या बाजूने निकाल देणार याकडे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पवना बंद जलवाहिनी हा `ड्रीम प्रोजेक्ट`आहे. त्यांनीच तो आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना सुरु केला होता. मात्र, भाजपसह स्थानिकांचा विरोध आणि नंतर झालेल्या आंदोलनामुळे तो २०११ ला बंद पडला.

Mahesh Landge and Bala Bhegade
Pune NCP: प्रशांत जगतापांनी जड अंत:करणाने दादांचा फोटो काढला; भरलेल्या मनाने जयंतरावांचा लावला

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तो आता पुन्हा सुरु करण्याची मागणी भाजपचे आमदार लांडगे यांनी आज सभागृहात केली. तर, त्य़ाला बाहेर त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदार भेगडेंनी लगेच विरोध केला. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा अधांतरी लटकले गेल्य़ाने पिंपरी-चिंचवडकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

पिंपरी-चिंचवडला सध्या मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी धरणातील पाणी दररोज नदीत सोडले जाते. ते चाळीस किलोमीटरवर शहरातील बंधाऱ्यातून उचलले जाते. धरण ते बंधारा या प्रवाहात पाण्याचा मोठा अपव्यय होत असल्याने तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरु केला होता.

त्यावर काही कोटी रुपये खर्चही झाले. मात्र, त्याला विरोध करणारे स्थानिक आणि शिवसेना, भाजप यांनी ९ ऑगस्ट २०११ रोजी `पुणे-मुंबई एक्सप्रेस वे` वर `रास्ता रोको` केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आली होती.

Mahesh Landge and Bala Bhegade
ED Director Sanjay Mishra : 'ईडी'च्या मिश्रांना शेवटची संधी; तिसऱ्यांदा मिळाली मुदतवाढ

दरम्यान, २०१७ ला पिंपरी महापालिकेत भाजप प्रथमच सत्तेत आली. त्यानंतर २५ नोव्हेबर २०१९ पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरु झाला. तो अद्याप सुरुच आहे. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आमदार लांडगेंनी बंद झालेला पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पुन्हा सुरु करण्याची मागणी विधानसभेत केली. शहराला पाण्याची उणीव आणि समस्या जाणवत असल्याचे ते म्हणाले.

तसेच उद्योगांना एसटीपीचे पाणी देण्याचीही मागणी केली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी बचत होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यावर प्रतिक्रिया देताना बाळा भेगडेंनी ही योजना पुन्हा सुरु करण्यास आपला विरोध कायम असल्याचे ठामपणे सांगितले. त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. पवना धरणबाधित शेतकऱ्यांचे पुर्नवसन अद्याप बाकी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Mahesh Landge and Bala Bhegade
शिंदे गटाच्या या आमदाराने पाहिली उद्धव ठाकरेंची संपूर्ण मुलाखत...

पिंपरी-चिंचवडला बंद जलवाहिनीतून पाणी दिले, तर आमचे नुकसान होणार आहे, असे ते म्हणाले. त्याचे गणित त्यांनी उलगडून सांगितले. साडेदहा टीएमसीच्या पवना धरणातील साडेसहा टीएमसी पिंपरी-चिंचवड, एक टीएमसी मृतसाठा, अर्धा टीमसीचे बाष्बीभवन यातून राहिलेले पाणी मावळातील दोन शहरे आणि सत्तर गावांच्या पाणी योजना तसेच दहा हजार हेक्टर बागायती शेतीला कसे पुरे पडणार, अशी विचारणा त्यांनी केली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com