Sadabhau Khot Latest Marathi News, Chandrakant Handore Latest Marathi News
Sadabhau Khot Latest Marathi News, Chandrakant Handore Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

हंडोरेंकडे जमिनीचा तुकडाही नाही; सदाभाऊंकडे 57 लाखांच्या दोन गाड्या अन् चौदा गुन्हे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची जमीन नाही. त्यांच्या नावावर केवळ मुंबईत एक फ्लॅट आहे. तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांच्याकडे 57 लाख रुपये किंमतीच्या दोन गाड्या आहेत. तसेच त्यांच्यावर विविध प्रकारचे चौदा गुन्हे दाखल आहेत. (Sadabhau Khot Latest Marathi News)

विधान परिषदेच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात हंडोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती केवळ 1 कोटी 45 लाख रुपये एवढी आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये हंडोरे व भाजपचे उमेदवार श्रीकांत भारतीय यांची संपत्ती सर्वात कमी आहे. भारतीय यांची संपत्तीही 1 कोटी 45 लाखांच्या जवळपास आहे.

हंडोरे यांची जंगम मालमत्ता सुमारे 70 लाख रुपये एवढी आहे. तर स्थावर मालमत्ता 75 लाख रुपयांची आहे. त्यामध्ये चेंबूरमध्ये एक फ्लॅट आणि पत्नीच्या नावे 30 लाख रुपये किंमतीचा खंडाळा येथे एक प्लॉट आहे. हंडोरे कुटुंबियांकडे इतर कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदाभाऊ खोत यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमविणे, आंदोलन अशा प्रकारचे 14 गुन्हे आहेत. त्यांच्याकडे एकूण जंगम मालमत्ता सुमारे 1 कोटी 73 लाख रुपये एवढी असून त्यात सुमारे अडीच लाखांचे सोन्याचे दागिने आहेत. तसेच 31 लाख व 26 लाख रुपये किंमतीच्या दोन कार आहेत. खोट कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता सुमारे 1 कोटी 12 लाख रुपयांची आहे. तर एकूण संपत्ती तीन कोटी रुपयांची आहे.

सचिन अहिरांपेक्षा पत्नी श्रीमंत

शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर यांची एकूण संपत्ती 37 कोटी एवढी आहे. त्यामध्ये पत्नीच्या नावे 18 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. अहिर यांच्या नावावर 4 कोटी 56 लाखांची स्थावर तर 3 कोटी 69 लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्या नावावर एकही वाहन नाही. पत्नीच्या नावे 9 कोटी 66 लाखांची जंगम मालमत्ता आहे. अहिर कुटुंबाकडे साडे सहा किलो चांदी आहे.

आमश्या पाडवींवर कर्ज नाही

शिवसेनेचे उमेदवार आमश्या पाडवी यांची एकूण संपत्ती 4 कोटी 80 लाख रुपये एवढी असून त्यामध्ये त्यांच्याकडे 36 लाखांची जंगम मालमत्ता आहे. पाडवी कुटुंबाची स्थावर मालमत्ता सुमारे चार कोटी एवढी आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारेच कर्ज नाही.

भाई जगतापांकडे तीन मर्सिडीज

काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांच्याकडे तीन मर्सिडीज आहेत. त्यांच्या कुटुंबाच्या नावावर एकूण 50 कोटींची संपत्ती आहे. त्यामध्ये त्यांच्या नावे 17 कोटी 40 लाखांची तर पत्नीच्या नावे 2 कोटी 97 लाखांची जंगम मालमत्ता आहे. हिंदू अविभक्त कुटुंबाच्या नावे 12 लाख 84 हजार आणि मुलीच्या नावे 1 कोटी 29 लाखांची संपत्ती आहे. जगतापांकडे 13 कोटी 9 लाखांची तर पत्नीकडे 15 कोटी दोन लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT