jayant patil uddhav thackeray.jpg sarkarnama
मुंबई

Jayant Patil Vs Uddhav Thackeray : रायगडच्या पराभवाचा वचपा ठाकरेंनी काढला अन् जयंत पाटील यांचा पराभव झाला?

Akshay Sabale

विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधान परिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील करून दाखवत असे. या विधान परिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला.

महाविकास आघाडीकडे ( Mahavikas Aghadi ) दोन उमेदवार निवडून येतील, एवढीच मते होती. पण, ऐनवेळी शिवसेनेनं ( ठाकरे गट ) मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देत मैदानात उतरविण्यात आलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली होती. त्यामुळे जयंत पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. जयंत पाटील यांच्या पराभवानंतर सोशल मीडियावर वेगळी चर्चा रंगली आहे.

कोकण पट्ट्यातील रायगड आणि मावळ मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची अर्थात जयंत पाटील यांची ताकद आहे. लोकसभेला शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) उमेदवारांना जयंत पाटलांकडून अपेक्षित अशी मदत मिळाली नाही. त्यामुळे रायगडमध्ये अनंत गिते ( Anant Gite ) आणि मावळात संजोग वाघेरे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. हीच खंत ठाकरे गटाच्या मनाला लागत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर ऐनवेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकर ( Milind Narvekar ) यांना ठाकरे गटानं उतरवून वचपा काढला, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटत आहेत. तर, उबाठानं दोस्तीत कुस्ती, गद्दारी केली आणि मिलिंद नार्वेकरांना उभे केलं, व्हायचं तेच झालं, असंही एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

सोशल मीडियात प्रतिक्रिया काय?

'एक्स' अकाउंटवर प्रशांत धुमाळ या नेटकऱ्यानं म्हटलं की, "शेतकरी कामगार पक्षाला मानणारा रायगड भागात मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी आपल्याला मानणारी जवळपास लाखभर मते सुनील तटकरेंकडे फिरवल्याची चर्चा आहे. यामुळेच विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी मदत न करण्याचा निर्णय घेतला."

"निवडणूक बिनविरोध होणार होती. संख्याबळनुसार महायुतीचे 9, मविआचे 2 उमेदवार आमदार होणार होते. जयंत पाटील यांच्यासारखा कष्टकरी, शेतकरी, अभ्यासू व्यक्ती, आगरी कोळी नेता निवडून येणार होता. पण, वेळेवर उबाठा गटाने दोस्तीत कुस्ती केली, गद्दारी केली आणि मिलिंद नार्वेकरला उभं केलं शेवटी व्हायचं ते झालं," असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं, "शेकापचे जयंत पाटील यांनी कायमच जातीयवादी पक्षाला विरोध केला. शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारले. 1999 ते 2014 काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत राहिले. आज त्यांचा घात झाला. लोकसभा निवडणुकीत शेकापच्या लोकांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला. जयंत पाटील यांनी लक्ष घालायला पाहिजे होते."

"विधीमंडळाची आयुधे उत्तम पद्धतीने वापरणारे, दुर्लक्षित विषय पटलावर ठेवणारे शेकापचे जयंत पाटील पडले. दुःखद. उद्धव ठाकरे परिषदेचे आमदार, त्यांचा मुलगा आमदार आणि उद्धव ठाकरे यांचा पीए सुध्दा आमदार. नार्वेकर यांच्यासाठी जयंतरावांचा बळी घेतलाय. रायगड मधील पराभवाचा वचपा काढलाय," असंही नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT