Anil Parab Sarkarnama
मुंबई

MLC Election 2024 Results : मुंबईत ठाकरेंचाच आव्वाज..! अनिल परबांनी विजयाचा गुलाल उधळला, तर भाजपच्या डावखरेंनी कोकणचा गड राखला!

Deepak Kulkarni

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यामध्ये मुंबई पदवीधर,कोकण पदवीवर,नाशिक शिक्षक व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा समावेश होता. विधानपरिषदेच्या या 4 जागांसाठी 26 जून रोजी चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीत मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब (Anil Parab) विजयी झाले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी भाजपचा गड कायम राखला आहे.

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तसेच नाशिक व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक झाली. या चारही ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली होती. त्यानंतर सर्वांना निकालाकडे लक्ष लागलेले होते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले होते. तर,कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार रिंगणात होता.

तर महायुतीत भाजपकडून (BJP) मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर या जागांवर उमेदवार देण्यात आले होते. मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देण्यात आला होता. नाशिक शिक्षक मतदारसंघात देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतंत्र उमेदवार होता.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आणि लोकसभा निवडणुकीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने ती शिवसेना ठाकरे गटाने प्रतिष्ठेची केली होती. यात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब आणि भाजपचे उमेदवार किरण शेलार यांच्यात थेट लढत झाली. या लढतीत ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला असल्याची माहिती पुढे येत आहे.

तसेच कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून रमेश कीर हे रिंगणात होते. त्यात डावखरेंनी तिसऱ्यांदा विजय मिळवत भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघातील वर्चस्व कायम राखले असल्याची माहिती समोर येत आहे.

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवार रिंगणात आहे. यात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे, महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यात शिंदे गटाचे दराडे हे आघाडीवर असल्याची माहिती आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT