High Court Cancels MMRDA Notice Sarkarnama
मुंबई

Mumbai Metro : मेट्रोच्या कामात MMRDA चा खोडा? अधिकाऱ्यांनी लाच मागितल्याचा 'सिस्ट्रा' कंपनीचा आरोप, हायकोर्टाकडून 'ती' नोटीस रद्द

High Court Cancels MMRDA Notice : मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या फ्रान्समधील 'सिस्ट्रा' (Systra) या कंपनीने महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) अधिकारी लाच मागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 26 Feb : मुंबई मेट्रो प्रकल्पांसाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या फ्रान्समधील 'सिस्ट्रा' (Systra) या कंपनीने महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (MMRDA) अधिकारी लाच मागत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तर याबाबत फ्रान्सच्या दूतावासाने दिल्लीतील महाराष्ट्राच्या निवासी आयुक्तांना पत्र पाठवल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. फ्रान्सच्या दूतावासांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. MMRDA चा कारभार उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी तात्काळ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

एकीकडे एमएमआरडीएने 'सिस्ट्रा' कंपनीचे लाच मागितल्याचे आरोप फेटाळले आहेत. मात्र, त्याचवेळी MMRDA ने या कंपनीला कंत्राट रद्द करण्याबाबत बजावलेली नोटीस मुंबई उच्च न्यायालयाने बैकायदेशीर ठरवत रद्द केली आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिल्याचं दिसत आहे.

MMRDA ने कंपनीला पाठवलेल्या नोटीशीविरोधात कंपनीनं हायकोर्टात धाव घेतली होती. कंपनीच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एमएमआरडीएने कंपनीचं म्हणणं ऐकून घेऊन त्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

ठाणे-भिवंडी-कल्याण, अंधेरी-सीएसएआय व भाईंदर मेट्रोचे सल्लागार म्हणून काम करण्यासाठी MMRDA ने सिस्ट्रा या कंपनीची निविदा मंजूर केली होती. कंपनीला 42 महिन्यांचे कंत्राट देण्यात आलं होतं. 31 मे 2021 ते 30 नोव्हेंबर 2024 या काळासाठी हे कंत्राट देण्यात आलं होतं. त्यानंतर कंपनीने मुदतवाढीसाठी केलेल्या अर्जाला MMRDA ने मान्यता दिली होती.

मुदतवाढ दिल्यानंतर हे कंत्राट 31 डिसेंबर 2026 रोजी संपणार होता. मात्र 3 जानेवारी 2025 रोजी MMRDA ने अचानक कंपनीला हे कंत्राट रद्द केल्याची नोटीस दिली. त्यामुळे या नोटीशी विरोधात कंपनीने हायकोर्टात धाव घेतली. धक्कादायक बाब म्हणजे कंत्राट अचानक रद्द का केलं? याबाबतचं कोणतंही कारण एमएमआरडीएने कंपनीला दिलेलं नाही. त्यामुळे कोर्टाने एमएमआरडीची नोटीस बेकायदेशीर असल्याचं सांगत ती रद्द केली.

कंपनीचे आरोप काय?

सिस्ट्रा कंपनीने एमएमआरडीएचे अधिकारी बिलं मुद्दाम थकवतात आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी देयके मंजूर करण्यासाठी पैसे मागतात आणि दबाव आणतात, असा गंभीर आरोप केला आहे. मात्र हे आरोप एमएमआरडीने फेटाळले आहेत.

दरम्यान, फ्रान्सच्या सिस्ट्रा या कंपनीने केलेल्या आरोपांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याशी मी बोलेन अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. तसंच पारदर्शकता राखण्यासाठी कोणतीही किंमत मोजू असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT