MNS Toll Agitation Sarkarnama
मुंबई

MNS Agitation : राज यांच्या इशाऱ्यानंतर मनसैनिक आक्रमक; मुलुंड, पनवेल, ऐरोली, बीडमधून टोल न घेता वाहने सोडली

Vijaykumar Dudhale

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक बनले आहेत. त्यांनी मुलुंड, पनवेल, ऐरोली आणि धुळे-सोलापूर महामार्गावरील बीड येथील टोल नाक्यांवर मोफत वाहने सोडली. या वेळी अविनाश जाधव यांनी स्वतः मुलुंडच्या टोल नाक्यावर थांबून चारचाकी वाहने टोल न भरता सोडून दिली. (MNS Activist aggressive after Raj Thackeray's warning)

राज ठाकरे यांनी आज (ता. ९ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत टोलसंदर्भात पुन्हा एल्गार पुकारला. त्यात त्यांनी युती आणि आघाडीतील नेत्यांची जुनी भाषणे दाखवून पोलखोल केली. त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बोलताना चारचाकी, तीनचाकी आणि एसटी बस यांना टोलमध्ये सवलत देण्यात आलेली आहे, असे विधान केले होते. त्याचा राज ठाकरे यांनी ‘देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलत आहेत,’ या शब्दांत समाचार घेतला होता.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आपण टोलसंदर्भातील भूमिका घेणार आहोत. ते काय निर्णय देतात, हे पाहू. त्यानंतर आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रत्येक टोल नाक्यावर थांबून पाहणी करतील, त्यावेळी टोलवसुली केल्याचे आढळल्यास टोल नाके पेटवून देण्यात येतील, असा इशारा दिला होता.

राज यांच्या इशाऱ्यानंतर ठाण्याचे अविनाश जाधव यांनी मुलुंड टोल नाक्यावर थांबून फडणवीसांचा व्हिडिओ दाखवत चालकांमध्ये जागृती करत वाहने सोडून दिली. या वेळी जाधव आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली. मुलुंडबरोबरच पनवेलच्या नाक्यावरूनही टोल न घेता वाहने सोडण्यात आली.

राज ठाकरे यांची दुपारी पत्रकार परिषद झाली. त्याचा मुंबई आणि मुंबईबाहेरही परिणाम दिसून आला. नवी मुंबईतील ऐरोली टोल नाक्यावरूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोफत वाहने सोडून दिली. त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून जाणऱ्या सोलापूर-धुळे या महामार्गावरील टोलमधूनही वाहने टोल न घेता सोडून देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT