Eknath Shinde, Raj Thackeray Sarrkarnama
मुंबई

Kalyan Lok Sabha Constituency : आधी भिडले आता मनोमिलन; कल्याणमध्ये मनसे-शिंदे गटात काय चाललंय ?

शर्मिला वाळुंज

Mumbai Political News : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीच्या रिंगणात टक्कर देण्यासाठी मनसे चाचपणी करताना दिसत आहे. तर दुसरीकडे दिवा येथील विकासकामाची पाहणी करताना पालिका आयुक्त बांगर यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकत्र आले.

राज्यात टोलवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र आले होते. त्यानंतर आता स्थानिक पातळीवरही आमदार, पदाधिकाऱ्यांनी आपले सूत जुळवून घेतले का ? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Latest Political News)

कल्याण लोकसभा क्षेत्रावर शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व असले तरी सध्या भाजप, ठाकरे गट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरून शिंदे गटाला टक्कर देण्याची तयारी करत आहे. त्यातच मनसेनेही या भागाची चाचपणी सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या उलथापालथी होत असून शिंदे गट मनसे विरोधात आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

खासदरकीवरून दोन्ही पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आपापसात सोशल मीडियावर भिडले. यानंतर मात्र टोल प्रश्नावरून शिवसेना शिंदे गट आणि मनसे नेते यांची एकत्रित बैठक झाली. वरिष्ठ पातळीवर ही बैठक होताच कल्याण लोकसभेतील दिवा शहरातील वातावरणही बदलल्याचे पहायला मिळाले. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर दिवा येथील एफओबी कामाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी आले होते. (Maharashtra Political News)

यावेळी शिवसेनेचे ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि मनसेचे आमदार राजू पाटील हे उपस्थित होते. यांनी एकत्रित येत कामातील अडथळे दूर कसे होतील, काय अडचणी आहेत याविषयी पाहणी करत आयुक्तांना कल्पना दिली. यावेळी रमाकांत मढवी यांच्या गाडीतून आमदार पाटील यांनी प्रवास केला. यावेळी आमचे विधानसभेचे उमेदवार आहेत, अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. यामुळे शिवसेना शिंदे गट व मनसेचे मनोमिलन झाल्याचे बोलले जात आहे.

विकासकामांसाठी एकत्र

दिव्याच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकत्र असतील तर त्यात दुमत करण्याचे कारण नाही. मनसे आमदार राजू पाटील आणि आमचा डीएनए एकच आहे. त्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. विकासकामांसाठी आम्ही नक्कीच एकत्र येऊ, असे ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी सांगितले.

राजू पाटील म्हणाले, पक्षीय राजकारण हे आचारसंहिता लागले की त्या काळात करावे. इतर वेळी आपण विकासकामे करत राहू. लोकांनी अपेक्षेने आपल्याला निवडून दिलेले असते. त्यामुळे असे कोणाचे हेवेदावे देखील नसतात की एकत्र येऊ नये. काही गोष्टी एकमेकांना सोबत घेऊन विचार करून त्या आमलात आणाव्या लागतात.

राष्ट्रवादीमुळे समीकरण बदलणार ?

राज्यात राष्ट्रवादी सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद दिले गेले. तसेच पुढील मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या नावाची चर्चा होत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाढती जवळीक पाहता शिवसेना शिंदे गट व मनसे एकत्र आल्याची चर्चा होत आहे. सत्ताकारण आणि विकासकामांसाठी शिंदे गट आणि मनसे भविष्यात एकत्र आले तर राजकारणातील समीकरणे बदलू शकतात.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT