Raj Thackeray, Uddhav Thackeray, Aditya Thackeray Sarkarnama
मुंबई

MNS Worli Constituency News : ..तरीही 'मनसे'ने वरळी मतदारसंघातूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरवला उमेदवार!

MNS Second Candidate list : जाणून घ्या, नेमकी कोणाला दिली उमेदवारी; आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Mayur Ratnaparkhe

MNS Candidate list For Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आज(मंगळवार) दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 45 उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. या यादीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्याही नावाचा समावेश आहे. तर विशेष बाब म्हणजे वरळी मतदारसंघातूनही मनसेने उमेदवार दिला आहे. या ठिकाणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांची थेट लढत असणार आहे.

खरंतर अमित ठाकरे हे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने, त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच दादरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कदाचित उमेदवार जाहीर होणार नाही, असा अंदाज वर्तवला जात होता. त्याचप्रमाणे त्याची परतफेड म्हणून वरळीमध्ये आदित्य ठाकरेंच्या विरोधातही मनसे उमेदवार जाहीर करणार नाही, अशीच सर्वत्र चर्चा होती.

परंतु राज ठाकरे यांनी या सर्व चर्चांना फोल ठरवत, आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मनसेचे फायरब्रॅण्ड नेते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दादर मतदारसंघाबाबत काय भूमिका घेतो, याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. कारण, आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने तगडा उमेदवार दिला आहे. त्यामुळे आता अमित ठाकरेंविरोधातही दादरमध्ये तगडा उमेदवारच दिला जाण्याची दाट शक्यता आहे.

संदीप देशपांडे यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही त्यांच्याविरोधात कायमच आक्रमक राहिलेला आहे. अशावेळी आता विधानसभा निवडणुकीत संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे हे थेट समोरासमोर येणार असल्याने, राज्यभरातील अन्य ठिकाणच्या अटीतटीच्या लढतीमध्ये या देखील लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण, या मतदारसंघातील लढत ही एकप्रकारे दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT