Bala Nandgaonkar| Raj Thackeray| Sarkarnama
मुंबई

काय थट्टा चालवली काय? : राज ठाकरेंची वाढीव सुरक्षा पाहून मनसे नेते संतापले

राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर मनसे नेते नाराज

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्य सरकारकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मात्र, वाढवलेली सुरक्षा पाहून मनसे नेते बाळ नांदगावकर (Bala Nandgaonkar) हे राज्य सरकारवर चांगलेच संतापले आहेत. ‘राज यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक इन्सेक्टर आणि एक पोलिस वाढीव देण्यात आला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरु आहे काय?. त्यापेक्षा सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे,’ अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली. (MNS leader angry over Raj Thackeray's security)

औरंगाबादमधील सभेनंतर राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आलेले आहे. भोंग्यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली असून भोंग्यबाबत सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी या धमक्या दिल्या जात आहेत, असेही मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. धमकीच्या या पत्रानंतर नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याची मागणी केली होती.

नांदगावकर यांच्या मागणीनुसार राज ठाकरे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने राज यांची ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा कायम ठेवली आहे. फक्त पोलिसांच्या संख्येत वाढ केली आहे. राज यांच्या ताफ्यात एक अतिरिक्त पोलिस अधिकारी आणि अंमलदार सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी राज यांनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर राज्य सरकारने त्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे.

राज्य सरकारकडून वाढविण्यात आलेल्या अपुरा सुरक्षेबाबत बाळा नांदगावकर चांगलेच संतप्त झाले आहेत. त्यांनी सांगितले की, मी जेव्हा आज राज ठाकरेंच्या घरी गेलो, तेव्हा एक पोलिस इन्स्पेक्टर आणि पोलिस कर्मचारी सुरक्षेसाठी दिला आहे. मग कशाला सुरक्षा देताय? थट्टा सुरु आहे का?. त्यापेक्षा सुरक्षा देऊच नका. सरकार म्हणून निर्णय घ्यायची आवश्यकता आहे.

सरकार म्हणून तुम्ही जेव्हा शपथ घेता, तेव्हा कुणाचेही द्वेष करणार नाही, सर्वांना समानतेची वागणूक देऊ अशी शपथ घेतलेली असते. आज ज्यांना गरज नाही, त्यांना प्रचंड सुरक्षा देण्यात आलेली आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांनाच का सुरक्षा दिली जात नाही?, असा सवालही नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT