MNS chief invites Shiv Sena chief : मुंबईसह महाराष्ट्रात ठाकरे बंधूच्या युतीच्या चर्चांना जोर आहे. तसे दोघा बंधूंकडून संकेत दिले जात आहे. सत्ताधारी महायुतीमधील भाजप-शिवसेना या युतीवरून ठाकरे बंधूंना डिवचत असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घरी आमंत्रित केले आहे.
राज ठाकरे यांची दोन दिवसापूर्वी भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यांनतर आता लगेगच उद्धव ठाकरे यांना घरी येण्याचं आमंत्रण दिल्यानंतर महायुतीमध्ये पुन्हा चलबिचल झाली आहे.
गणेशोत्सवाची मुंबईत जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे यांच्या दादरमधील घरी, 'शिवतीर्था'वर गणेशोत्सवाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या घरी दीड दिवसांचा गणेशोत्सव असतो. याच उत्सवासाठी आणि बाप्पााच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी आपले बंधू उद्धव ठाकरेंना आमंत्रित केलं आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे काही दिवसांपूर्वी 'मातोश्री'वर पोचले होते. खासदार संजय राऊत यांनी त्यांचा हात धरत गर्दीतून वाट काढत राज ठाकरेंना 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंपर्यंत नेले होते. राज ठाकरेंनी 'मातोश्री'वर दाखल होताच, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची खोली पाहिली.
राज ठाकरे 'मातोश्री'वर येऊन गेल्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. आता त्याला मुहुर्त लागला आहे. राज ठाकरे पूर्वी 'कृष्णकुंज'वर राहत होते. परंतु तिथंच शेजारी तीन वर्षांपूर्वी बांधलेल्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी शिफ्ट झाले आहेत. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या कधीही निवासस्थानी गेले नव्हते. परंतु गणेशोत्सवानिमित्ताने उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोचणार आहेत.
हिंदी भाषेच्या मुद्यावर आवाज उठवल्यानंतर, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळजवळ 20 वर्षांनी एकाच मंचावर आले होते. यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मातोश्री'वर पोहोचून त्यांना शुभेच्छा दिल्या. बऱ्याच वर्षांनी ते 'मातोश्री'वर आले, तेव्हा शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.
जवळपास दोन दशकांपूर्वी राज ठाकरे 'मातोश्री'वरून बाहेर पडले तेव्हा उद्धव ठाकरे वयाच्या चाळीशीच्या मध्यात होते. 2006मध्ये 'मनसे'ची स्थापना झाल्यापासून, राज ठाकरे कधीही उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी 'मातोश्री'ला गेले नव्हते. पण यावर्षी राज ठाकरे 'मातोश्री'वर पोहोचले तेव्हा उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी कधी येणार, याची चर्चा सुरू झाली.
बेस्ट पतपेढीच्या निकालात ठाकरे बंधूंच्या युती असलेल्या पॅनलचा पराभव झाला. यानंतर ठाकरे बंधू राज ठाकरे यांच्या घरी एकत्र येत आहेत. गणेशोत्सवानिमित्ताने दोघे बंधू एकत्र येत असल्याने ठाकरे बंधूंच्या, दोन्हीकडील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते खूश आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.