shrikant shinde, omi kalani  sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंचा नवा डाव? ओमी कलानी कुटुंबाशी का वाढवली जवळीक?

Bhagyashree Pradhan

Ulhasnagar News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. या निवडणुकीसाठी महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे तयारी करीत आहेत. या लोकसभा निवडणुकीत कलानी कुटुंब नेमके कोणत्या पक्षात आहे, अशी चर्चा रंगली होती. यावर त्यांनी आमचा टीम ओमी कलानी पक्ष असल्याचे सांगितले

उल्हासनगर येथील राजकारणात दबदबा असलेल्या कलानी कुटुंब लोकसभेला खासदार शिंदे यांना मदत करणार असल्याचे त्यांनी 'सरकारनामा'शी बोलताना स्पष्ट केले. त्यानंतर ओमी कलानी यांच्या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. त्यामुळे कलानी यांच्या निर्णयानंतर खासदार शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीला टीम ओमी कलानी जवळचे मित्र असणाऱ्या श्रीकांत शिंदे यांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिनीमॅरेथॉन स्पर्धेला श्रीकांत शिंदे हजर...

ओमी कलानी यांनी मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूंना झेंडा दाखवून कार्यक्रमाची सुरुवात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. या स्पर्धेत शिंदे स्वतः सहभागी झाल्याने विरोधकांनाही झटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

लोकसभा निवडणुकीसाठी ओमी यांनी दिला होता शब्द

माझे सर्वच राजकीय नेत्यांबरोबर संबंध चांगले आहेत. मात्र, मी लोकसभेसाठी मित्र श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) साथ देणार, असा शब्द दिला आहे. त्यामुळे लोकसभेला शिंदे यांना पाठिंबा देणार असून सध्या उल्हासनगर महापालिकेत टीम ओमी कलानी यांचे 22 नगरसेवक आहेत तर आजूबाजूच्या तीन ते चार गावात सरपंच आणि उपसरपंच आहेत. त्यामुळे शिंदेंना या सर्वांचा पाठिंबा असणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने फसवले

भाजपसोबत ज्यावेळी आम्ही गेलो, त्यावेळी भाजपने विधानसभेचे तिकीट देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला तिकीट दिले नाही. त्यामुळे मी नाराज झालो होतो. त्यानंतर मी पक्ष सोडला. त्यानंतर 'टीम ओमी कलानी' या नावाने मी पक्ष चालवत आहे. आता येणाऱ्या विधानसभेत अपक्ष म्हणूनच स्वतः निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'अशी' आहे पार्श्वभूमी

कलानी कुटुंब हे गेल्या चार दशकांपासून उल्हासनगरच्या राजकारणात सक्रिय आहे. पप्पू कलानी (Pappu Kalani) हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते. याच पक्षातून त्यांनी उल्हासनगर पालिकेत अध्यक्षपद आणि आमदारकी भूषवली. मात्र, त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे त्यांना काँग्रेस पक्षातून काढून टाकण्यात आले.

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. मात्र, हाती काही लागत नाही हे पाहून त्यांनी पुन्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातून 2004 मध्ये आमदारकी लढवली आणि ते आमदार म्हणून निवडून आले. पुन्हा काही कालांतराने त्यांनी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाशी हातमिळवणी केली. मात्र, त्यांच्यावर 2013 मध्ये इंदर भटीजा यांच्या खून खटल्याप्रकरणी न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली. यावेळी त्यांचा पुत्र ओमी कलानी यांनी भाजपची वाट पकडली. त्यानंतर त्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. पण त्यानंतरही यावेळी ओमी कलानी यांनी पप्पू कलानी हे कायमचे बाहेर असल्याचे सांगत मोठा गौप्यस्फोट केला होता.

(Edited by - Sachin Waghmare)

SCROLL FOR NEXT