Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आले. राज्य सरकारने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या. पण,त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम गेले तीन दिवस अहोरात्र झटत होती. तसेच त्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेंनी याचवेळी रिमोट हातात घेत सरकारी यंत्रणांवर कंट्रोल ठेवला होता.
मनोज जरांगे हे सामान्य कुटुंबातले तळमळीचे कार्यकर्ते असल्याने त्यांना न्याय द्यायला हवा, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी मांडली अन् त्या चौकटीत काम करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेले तीन दिवस त्यांचे कार्यालय व सचिव भूषण गगरानी यांच्या मार्गदर्शनाखाली जरांगे यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याला गगरानींचा अभ्यास आणि मंगेश चिवटे, अमोल शिंदे या मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांची जोड मिळाली.(Shrikant Shinde Maratha Reservation)
समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी नवा फॉर्म्युला तयार केला. नंतरच्या चर्चेत भाजपतर्फे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भाग घेतला. मंत्री दीपक केसरकर यांनी समन्वयाची मोलाची भूमिका बजावली. ट्रबलशूटर गिरीश महाजनही साथीला होते. ओबीसी समाजातील नेत्यांची संभाव्य नाराजी लक्षात घेत त्यांना न दुखावता अधिसूचना तयार करण्याची काळजी घेण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis ) ,अजित पवार ( Ajit Pawar ) हे त्यांच्या मतदारसंघात होते. तर दुसरीकडे जरांगेंचे वादळ मुंबईत दाखल झाले तर ते मंत्रालय परिसरात किंवा मलबार हिल परिसरात मंत्र्यांच्या बंगल्यांसमोर गर्दी करु शकतील. यामुळे कोणतीही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी गृहविभाग घेत होता.
मराठा आरक्षणासाठी जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा जनसागर मुंबईच्या वेशीवर धडकल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करत त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्याबाबत रात्रीतून अधिसूचना काढली. मागण्यांची पूर्तता रात्रीतूनच व्हावी, यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पडद्यामागून सूत्रे हलवली. परिणामी मुंबईच्या वेशीवर धडकलेल्या मराठ्यांच्या जनसागराला पहाटेच ऐतिहासिक बातमी मिळाली.
नवी मुंबईतील सभेत जरांगेंची तोफ धडाडत असतानाच, सरकार दरबारी जोरदार खलबते सुरू झाली. सरकारमधील मंत्री,अधिकारी त्यात सामील झाले. त्यात खासदार श्रीकांत फोनाफोनी करत, बहुतांश यंत्रणा कामाला लावली. विशेष म्हणजे, काना, मात्रा चेक करून त्यावरूनही जरांगे-पाटील सरकारची कोंडी करण्याची असल्याने त्याकडेही बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी खासदार शिंदेंनी काही जणांवर सोपविल्याचे दिसून आले. (Manoj Jarange Patil Maratha Reservation)
जरांगेंच्या नेतृत्वाखालील मराठ्यांचा जनसागर मुंबईत शिरला,तर अडचण झाली असती. हे ओळखून खासदार श्रीकांत यांनी सूत्रे हलवलीच नाही, तर ती आपल्या हाती घेतली. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात राहिले. मुख्यमंत्री, काही मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत,त्यांनी अधिसूचना काढण्यासाठी पुढाकार घेतला. (Shrikant Shinde Maratha Reservation)
दरम्यान,या आंदोलनातून ते एका अर्थाने 'पॉवरस्टेशन' असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.कारण सहसा सरकारी पातळीवर न होणाऱ्या अतिशय वेगवान हालचाली आणि कार्यवाही त्यांनी काही तासांत घडवून आणली. त्यामुळेच रात्रीतून अधिसूचना निघू शकली.27जानेवारी 2024ची पहाट मराठा समाजासाठी सकारात्मक बातमी घेऊन आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.