Kalyan Loksabha Election : कल्याण लोकसभेचे उमेदवार आपणच असणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदेंनी यापूर्वीच जाहीर करून टाकले आहे, तर दुसरीकडे आमदार राजू पाटील यांचे नाव मनसेकडून कल्याण लोकसभेसाठी पुढे येऊ लागले आहे. याचदरम्यान, खासदार शिंदे आणि आमदार राजू पाटलांमधल्या शाब्दिक चकमकी वाढल्या आहेत.
यावरूनच कल्याण लोकसभेची निवडणूक लढविण्यापूर्वी नावापुढे आजी शब्दाऐवजी माजी शब्द लागणार नाही ना, असा उपरोधिक सल्ला खासदार शिंदेंनी आमदार पाटलांना दिला होता. तर एक "नाथ" आहे घरी म्हणून ही मुजोरी ?...बापाने पॉकेटमनी म्हणून MMRDA ,MSRDC ,चा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता ? अशी बोचरी टीका राजू पाटलांनी श्रीकांत शिंदेंवर केली होती. पण आता खासदार शिंदेंनी मनसे आमदार राजू पाटलांना कल्याण ग्रामीणमध्ये मोठा धक्का दिला आहे.
मनसे पक्षातील रस्ते आस्थापना व साधन सुविधा विभागाचे डोंबिवली शहराध्यक्ष यांसह या विभागातील इतर पदाधिकारी, नांदीवली येथील माजी महिला विभाग अध्यक्षांसह 14 पदाधिकाऱ्यांनी रविवारी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे कल्याण ग्रामीण भागात मनसेला पुन्हा एकदा धक्का बसला आहे.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांच्या उपस्थितीत या पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रवेश केला असून, फेसबुक ,ट्विटरवर आम्ही काम करत नाही, तर ग्राउंड लेव्हलला उतरून काम करतो, असे म्हणत या पदाधिकाऱ्यांनी जाता जाता मनसे आमदार पाटील यांना टोला लगावला आहे, तर खासदार डॉ. शिंदे यांनी आम्हाला असेच कार्यकर्ते हवे आहेत, असे म्हणत अप्रत्यक्षपणे आमदारांना डिवचले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील मनसेचे रस्ते आस्थापना व साधन सुविधा डोंबिवली शहर अध्यक्ष ओम लोके यांसह उपशहर अध्यक्ष, सचिव तसेच माजी महिला विभाग अध्यक्ष शीतल लोके, वकील सुहास तेलंग यांसह 14 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावर बोलताना खासदार डॉ. शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीकडे पाहून विविध पक्षांतील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
शिंदे म्हणाले, फिल्डवर काम करणारे, लोकांमध्ये जाणारे कार्यकर्ते आम्हाला हवे आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत सांगितली आहे. त्यामुळे यावर मी परत काही बोलणार नाही असे म्हणत खासदारांनी आमदार राजू पाटील(Raju Patil) यांना टोला लगावला आहे. कल्याण लोकसभा क्षेत्रातील विकासाची घोडदौड पाहून इतर पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत.पुढेही आणखी येतील, असे संकेतही खासदार शिंदेंनी दिले.
मनसेतून शिवसेनेत गेलेल्या माजी विभाग अध्यक्ष शीतल लोके म्हणाल्या, फक्त फेसबुक आणि ट्विटरवर आम्ही काम करत नाही. आम्ही ग्राउंड लेव्हलला उतरून काम करतो. पक्षात ही कार्यपद्धती पूर्वी राबवली जात होती. आता मात्र ती राबवली जात नाही ही खंत आम्हाला आहे. कारण आम्ही ग्राउंड लेव्हलचे कार्यकर्ते आहोत.
नागरिकांचे काम करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. अशा कार्यकर्त्यांना जर डावल गेलं, त्यांचे राजीनामे घेतले गेले. त्याकडे लक्ष दिले जात नाही पक्षाच्या जेव्हा महत्त्वाच्या बैठका असतात, ओळखपत्र वाटप केले जाते त्यामध्ये विभाग अध्यक्ष म्हणून माझं नावच नाही. मग आमचं अस्तित्व पक्षामध्ये काय आहे, असा विचार करायला आम्ही भाग पडतो.
आमदार राजू पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीत बरेचसे काम केलेले आहेत. तरीसुद्धा जी आमची खंत आहे ही आम्ही जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. त्याचा विचार केला गेला नाही त्यावर काही ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केल्याचे शीतल यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या वादानंतर आता शिवसेना आणि मनसेत वादाची ठिणगी पडली आहे. खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोपांची चिखलफेक करण्यात सुरू आहे.
खासदार श्रीकांत शिंदेंनी राजू पाटलांना आव्हान दिले होते. ते म्हणाले, काही लोकांना कल्याण लोकसभेची काळजी वाटते. मात्र, त्यांनी कल्याण लोकसभेची काळजी करायची गरज नाही. हा डॉक्टर श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभेमधूनच लढणार आणि 2014 ला अडीच लाखांच्या मतांनी जिंकून आला.(Shivsena Vs MNS)
नंतर 2019 ला साडेतीन लाखांच्या मतांनी निवडून आला. आता तुमची भर अजून पडलेली आहे. आता तोच तोही रेकॉर्ड तोडणार असल्याचा दावा शिंदेंनी केला होता. तसेच आपल्याला वायफळ बडबड करायची नाही. काही लोकांना मतदारसंघाची चिंता पडलेली आहे, असा अप्रत्यक्ष टोला राजू पाटलांना लगावला होता.
खासदार शिंदें म्हणाले, काही लोकांनी पाच वर्षांत ऑफिसदेखील उघडलं नाही. लोकांना माहिती नाही कुठे जायचं यांना भेटायला एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. चांगले मुख्यमंत्री या ठिकाणी लाभलेले आहेत. मात्र, काही लोकांना रोज टीकाटिप्पणी आणि खालच्या स्तरावर जाऊन भाषा करायचं टीका करायची ही सवय आहे. ही सवय इथे पण आहे.
पाच वर्षे लोकांनी जबाबदारी दिली. मात्र, पाच वर्षांत अजून काही कमावलं नाही. पाच वर्षे जबाबदारी दिल्यानंतर आता अजून मोठी स्वप्नं पडायला लागली. मात्र, स्वप्नं पडायला हरकत नाही 'मुंगेरीलाल के हसीन सपने...' स्वप्न हे बघितलं पाहिजे. मात्र, हेही स्वप्न बघा की, आजीच्या पुढे माजी लागता कामा नये म्हणे याचीही दक्षता घ्या. माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत, असा चिमटाही खासदार शिंदेंनी पाटलांना काढला होता.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.