Kiran Mane Controversy News
Kiran Mane Controversy News sarkarnama
मुंबई

किरण माने उद्या कुणाची गुपितं उलगडणार ? म्हणाले, ''जिंकेन नायतर मरेन''

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता किरण माने यांच्या फेसबूक पोस्टमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत आहेत. किरण माने (kiran mane) यांना राजकीय क्षेत्रातून पाठिंबा आणि विरोध होत असतानाच राजकीय पक्ष आता याप्रकरणी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

समाज माध्यमांवर राजकीय भूमिका मांडली म्हणून आपल्याला 'मुलगी झाली हो' या मालिकेतून काढून टाकण्यात आले, असा आरोप माने यांनी केला आहे. ‘माझ्यावर आरोप करणारे कलाकार भाजप (bjp) आणि मनसेशी (mns) संबंधित असल्याने माझ्यावर आरोप केले जात आहेत, असाही गंभीर आरोप किरण माने यांनी यापूर्वी केला आहे. (Kiran Mane Controversy News)

या विषयावरील वादावर खुलासे करण्यासाठी किरण माने यांनी शुक्रवारी (ता. ४) मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. यात ते काय खुलासे करतात, याकडे चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातही उत्सुकता आहे. मानेंनी आज फेसबूकवर पोस्ट शेअर करीत याबाबत माहिती दिली आहे.

"आपण राजकीय नेते खिशात घेऊन फिरतो.. काहीही कारस्थान करू.. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय??? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला." अशा मग्रूरीत हायेत ही धेंडं, ''असे किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये किरण माने म्हणतात..

...लै खुलासे करायचेत.

लै गुपितं उलगडायची हायेत.

हा आता माझा एकट्याचा लढा नाय र्‍हायला. तुम्हा सगळ्यांचा झालाय.

तुमी कुठल्याबी क्षेत्रात असा, तुमाला न सांगता-गुपचूप कटकारस्थान करून तुमाला कामावरनं काढायची छाती नाय झाली पायजे कुनाची.

कुठलीबी स्त्री असो वा पुरूष..तुमच्यावर खोटे आरोप करताना हजारवेळा इचार करंल असं कायतर करून दाखवतो...संविधानिक मार्गानं.. बघाच तुमी !

#किरण_माने_पॅटर्न हितनं फुडं तुमच्यावर कस्लाबी अन्याय होऊ देनार नाय !!!

...आवो, पैशाचा... सत्तेचा... वर्चस्ववादाचा माज एकच गोष्ट उतरवू शकते... 'संविधान' !

मला वाटलंवतं की ह्या अत्यंत क्रूर, निर्दयीपणे केलेल्या अन्यायाबद्दल या यंत्रनेचा 'अंतरात्मा' जागा होईल.. कुठल्यातरी राजकीय नेत्याला आपला सोत्ताचा संघर्ष आठवंल... पन नाय.. ९९% राजकीय नेते भांडलवलदारांचे गुलाम हायेत. माझ्यावर अन्याय करनारी यंत्रना पैशांच्या धुंदीत हाय... "आपण राजकीय नेते खिशात घेऊन फिरतो.. काहीही कारस्थान करू.. हा कोण क्षुल्लक सामान्य माणूस आपल्याशी लढू पहातोय??? अस्सा खड्यासारखा बाजूला करू त्याला." अशा मग्रूरीत हायेत ही धेंडं.

...पन भावांनो, ही मुजोरी-बेबंदशाही मोडून काढण्याचा शेवटचा मार्ग डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हातात ठेवलाय की. आता सुट्टी नाय. जीवाचं रान करीन.. रक्ताचं पानी करीन...होत्याचं नव्हतं करीन... पन न्याय मिळवूनच राहीन... जिंकेन नायतर मरेन. जिंकलो, तर तुम्हा सगळ्यांचा विजय आसंल... मेलो...तर मात्र तुम्हा सगळ्यांना मुडद्यासारखं जगत, खाली मान घालून, घाबरत काम करावं लागंल... मान वर केली, आवाज उठवला, बंड केलं तर "एS तुझा किरण माने करेन." असं सुनावलं जाईल...

पन काय बी म्हना.. या लोकांनी अन्याय करायला लै चुकीचा मानूस निवडला भावांनो.. नाय नाय नाय नाय... लै हार्ड मानसाला हात घातलाय ह्या बेट्यांनी ! नाय ह्यांना पळता भुई थोडी केली तर किरण माने नांव लावनार नाय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT