Mumbai Election 2025  Sarkarnama
मुंबई

BMC Election 2025: निवडणुकीपूर्वीची मोर्चेबांधणी! ठाकरे बंधूंकडून युतीची घोषणा कधी?

Mumbai Election 2025 strategies and alliances: एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री-आमदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडील ओढा अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना निवडणुकीपूर्वीच्या सज्जतेसाठी कसून तयार व्हावे लागणार आहे.

दीपा कदम

मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे, तशी दोन्ही शिवसेनेमध्ये मोर्चेबांधणी सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे लक्ष मनसेबरोबरील युतीकडे लागले आहे. त्याचबरोबर त्यांना पक्षाची संघटनाही नव्याने बांधावी लागणार आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मंत्री-आमदारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडील ओढा अस्वस्थ करणारा आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना निवडणुकीपूर्वीच्या सज्जतेसाठी कसून तयार व्हावे लागणार आहे.

तीन वर्षांपूर्वी पक्षात उभी फूट पडून पक्षाची अगदी वाताहत झाल्याच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, देशाच्या सर्वांत श्रीमंत अशा मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या या पक्षाला याच शहरात शाखांची नव्याने बांधणी करताना नाकीनऊ आले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेतील आजी-माजी अशा जवळपास शंभरपेक्षा अधिक नगरसेवकांना गळाला लावल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेची मजबूत यंत्रणा विस्कळित झाल्याचे दिसते. पक्षाची नव्याने बांधणी करण्यासोबतच निवडणुकीला सामोरे जाताना भक्कम साथ देणारा एक राजकीय पक्ष सोबत असावा, याची उद्धव ठाकरे यांना गरज वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी मनसेच्या दिशेने हात पुढे केला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांना साथ देण्याची तयारी दर्शवल्याने ठाकरे सेनेची मनसेसोबत युती होण्याचे जवळपास निश्चित झाल्याचे दिसते. गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. मात्र त्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राज ठाकरे यांच्याकडे गणेश दर्शनाला जाऊन आले.

फडणवीस आणि शिंदेसोबत राज ठाकरे यांची असणारी मैत्री उद्धव ठाकरेंना मात्र अस्वस्थ करणारी आहे. शिवाय फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांमुळे या दोघांदरम्यान अधूनमधून भेटीगाठी होत असतात. उद्धव यांना कोंडीत पकडण्यासाठी फडणवीस यांनी यापूर्वी राजकीय कूटनीतीचे जबरदस्त प्रयोग केले असल्याने उद्धव हे ताकही फुंकून पिण्यात शहाणपण समजतील.

युतीची घोषणा कधी?

दोन ठाकरे बंधूंच्या युतीसाठीची पायाभरणी गेले तीन-चार महिने सुरू आहे. त्यातूनच पुढचे पाऊल टाकण्याचा बहुधा निर्णय झाला असावा. दोन भावांमधली कटुता कमी झाली, तरच राजकीय युती घडण्याचा मार्ग मोकळा असेल.

यासाठी या दोघांनीही मागील काही दिवसांत युती करण्यासाठी स्वत:ला आणि कार्यकर्त्यांनाही पुरेसा वेळ दिला आहे. येत्या दसरा मेळाव्याला या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फेटाळली आहे.

शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे यांची शिवसेना दसरा मेळावा आयोजित करते, तर याच मैदानात मनसे गुढीपाडव्याला मेळावा आयोजित करत असते. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांच्या व्यासपीठावर जाण्याची शक्यता तूर्तास तरी शक्य नाही. शिवाय महापालिका निवडणुका जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता असल्याने युतीची घोषणा इतक्या लवकर होण्याची शक्यता नसल्याचेही सांगितले जात आहे.

काँग्रेसची सावध भूमिका

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम महाविकास आघाडीवरही पडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना मशिदींवरील भोंगे, परप्रांतीय यावरून राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका काँग्रेससाठी अडचणीची ठरणारी आहे. शिवाय बिहार निवडणुकांचे वारे वाहत असल्याने काँग्रेसला मनसेचा वाराही लागलेला चालणारा नाही. या पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन भाऊ एकत्र येत असतील, तर आम्ही अडवणार नाही; पण राज ठाकरे यांनी विविध विषयांवर घेतलेल्या वादग्रस्त भूमिका मात्र इंडिया आघाडीला मानवणाऱ्या नसल्याचेही उद्धव ठाकरेंच्या कानावर घालण्यात आले आहे. राज्यात २०१९मध्ये अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीला राज ठाकरे यांच्या निमित्ताने बिघाडी होणार का, हा प्रश्न आहे.

काँग्रेसलाही महापालिका निवडणुकीत ठाकरे यांच्यासोबत जाण्यापेक्षा खात्रीशीर जिंकून येतील, अशा मुंबईतील २५ ते ३० जागांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. शिवाय उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात युती होणार असेल, तर उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेमुळे आकर्षित झालेला आणि मूलतः काँग्रेसचा पारंपरिक मतदार पक्षाकडे परतण्याची शक्यता वाढेल. राज ठाकरेंसोबतच्या युतीमुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेला मुस्लिम मते मिळण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज काँग्रेसकडून वर्तवला जात आहे. तरीही महाविकास आघाडीच्या निमित्ताने काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी निर्माण झालेले सौहार्दाचे संबंध पुढच्या काळात कायम राहावेत, असा प्रयत्न काँग्रेसकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटपात काँग्रेसच्या पारंपरिक जागांवर ठाकरेंकडून समझोता व्हावा, अशा प्रयत्नात काँग्रेस दिसते.

गरज बूस्टरची

मुंबईतील जरांगे यांच्या मराठा आंदोलनादरम्यान उद्धव ठाकरे यांची शिवसेना कार्यकर्त्याच्या भूमिकेत होते. मराठा-ओबीसी अशा वादापासून कायम दूर राहणाऱ्या शिवसेनेने यावेळी मात्र मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलकांना सक्रिय मदत करण्याची भूमिका घेतली. उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर पक्षाचे आमदार, खासदार, शाखाप्रमुख आणि सर्वसामान्य शिवसैनिक मदतीसाठी रस्त्यावर उतरला होता. यानिमित्ताने ठाकरे यांनी शिवसैनिकांना चालना देण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसैनिकांमध्ये नेहमीचा उत्साह मात्र दिसून आला नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवसैनिकांमध्ये नेहमी स्फुल्लिंग पेटवणारा असतो.

उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीची घोषणा करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास शिवसैनिकांमध्ये चेतना निर्माण करण्याची किमया राज ठाकरे साधू शकतात. उभ्या फुटीमुळे पडझड झालेल्या ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी एका जोरदार बूस्टरची गरज आहे. राज यांच्या निमित्ताने कदाचित ती मिळू शकते. एकाच विचारधारेच्या दोन पक्षांतील युतीमुळे दोन नेते एकत्र आल्यानंतर सामूहिक नेतृत्वाबद्दलची सुप्त स्पर्धा सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शिवसेना-मनसे एका व्यासपीठावर आले तरी दोन्ही पक्षांना आपापले सुभे राखूनच एकत्र येण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

शिंदेंना दूर ठेवले?

मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलन मोर्चाच्या आठ दिवस आधी राज्य सरकारने मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्स्थापना केली. यापूर्वी या समितीचे अध्यक्ष, उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील होते. त्यांच्या जागी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवी समितीचा स्थापना केली. या समितीचे अध्यक्षपद भाजपने पुन्हा स्वत:कडे ठेवल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. महायुतीमध्ये मराठा नेता म्हणून आपल्याला उपसमितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी शिंदे यांची इच्छा होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. राधाकृष्ण विखे यांच्या समितीला मंत्रिमंडळाचे पूर्ण अधिकार देत आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे नाराज असलेले शिंदे या आंदोलनापासून लांब राहिल्याचे दिसले. सरकारनेही नंतर जरांगे यांच्याशी वाटाघाटी करताना शिंदे यांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची चर्चा आहे. शिंदे यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवारही मराठा आंदोलनापासून दूर होते. मात्र त्यांच्याविषयी फार चर्चा रंगली नाही.

मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईत पाच दिवस ठिय्या मांडलेला असताना एकनाथ शिंदे गणेशोत्सवाचे निमित्त काढून पाचही दिवस सातारा जिल्ह्यातील दरे या मूळगावी पोहोचले. आंदोलकांनी दक्षिण मुंबईला जवळपास घेरले असताना सत्ताधारी महायुतीतील मराठा नेत्यांनी मात्र मौन राखून बघ्याची भूमिका घेणे पसंत केले होते. त्यामध्ये शिंदे यांचे नाव आघाडीवर होते. मराठा आंदोलनापासून अंतर राखणारे शिंदे यांचीच या आंदोलनाला फूस असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. दोन वर्षांपूर्वी जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने मोर्चा आणला होता. त्यावेळी तो मोर्चा नवी मुंबईत रोखण्यात तेव्हा मुख्यमंत्रिपदी असलेल्या एकनाथ शिंदे यांना यश आले होते. त्यांनी जरांगेंसोबतची शिष्टाई यशस्वी पार पाडली होती. आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान जरांगे यांनी आपल्या तिखट वाणीने फडणवीस यांचा यथेच्छ समाचार घेतला. तेच जरांगे शिंदे यांचे मात्र तोंडभरून कौतुक करताना दिसले.

फडणवीसांची मुत्सद्देगिरी

सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर जरांगे अडून बसतील आणि सरकारची कोंडी झाल्यावर मराठा नेता म्हणून चर्चेसाठी आपल्याला बोलावले जाईल, असा शिंदेंचा मनसुबा होता. मात्र तोही फडणवीसांनी उधळून लावला. फडणवीसांनी चर्चेची सर्व सूत्रे विखे यांच्याकडे दिली. आंदोलकांची मुंबईत येऊन आंदोलन करण्याची ऊर्मी पार पडल्यानंतर उत्साह थंड होण्यासाठीचा भरपूर वेळ सरकारने उपलब्ध करून दिला. त्यानंतर न्यायालयाकडून दबाव आल्यानंतर सरकारने जरांगे यांच्यासोबत चर्चेला सुरुवात केली. आंदोलन कधीही हाताबाहेर जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर जरांगे यांनी आलेल्या प्रस्तावावर फार घासाघीस न करता दुजोरा दिला. जरांगे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर फडणवीस यांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्याची इच्छाही बोलून दाखवली. फडणवीसांवर स्तुतिसुमने उधळली आणि ‘तुमचे आमचे वैर संपले’ अशी घोषणा केली. त्यानंतर जल्लोष करत आंदोलक माघारी परतले.

जाहिरातीमागे कोण?

आंदोलकांच्या पदरात काय आणि किती पडले, हा स्वतंत्र चर्चेचा विषय असला तरी महायुतीमध्ये विशेषत: शिंदे सेनेत यानंतर मोठी हालचाल सुरू झाल्याची चर्चा आहे. वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानापासून राज्याच्या सर्व चौकाचौकांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर ‘देवाभाऊ’ अशा जाहिराती आणि मोठमोठे बॅनर झळकले आहेत. मराठा समाजाला फडणवीसांनी न्याय दिला, असा या जाहिरात मोहिमेमागचा अर्थ आहे. ही जाहिरात कुणी दिली, याची सर्वत्र चर्चा असताना ते नाव मात्र अद्याप गुलदस्तातच आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना अंधारात ठेवून इतक्या मोठ्या प्रमाणात अशी राज्यभर जाहिरात मोहीम करण्यास कुणीही धजावणार नाही, हे स्पष्ट आहे.

भाजपने अधिकृतपणे ही जाहिरात मोहीम राबवली असती तर त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नव्हते. मात्र, या जाहिरात मोहिमेमागचा कर्ताधर्ता हा एकनाथ शिंदे यांच्या पक्षातीलच एक मंत्री असल्याची जोरदार चर्चा आहे. शिंदे यांच्या पक्षातील मंत्री, आमदारांचा फडणवीसांकडे वाढलेला ओढा ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणारी आहे. एकूणच जरांगे यांच्या आंदोलनानंतर सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत कलहासोबतच बड्या नेत्यांच्या आपसातील कुरघोडीचे राजकारण उघड्यावर आल्याचे दिसून आले.

(Edited by: Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT