Mumbai municipal polls : मुंबई महापालिका निवडणूक यंदा चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीनंतर निवडणुकीतील चुरस प्रचंड वाढली आहे. त्यांच्यासमोर प्रामुख्याने भाजप-शिवसेना युतीचे आव्हान असणार आहे. तर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकला चलोची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेही वंचित बहूजन आघाडीला सोबत घेत निवडणुकीत रंगत आणली आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही अवघे काही तास शिल्लक असतानाच सर्व पक्षांकडून उमेदवारांना परस्पर एबी फॉर्म दिले जात आहेत. त्यानुसार अनेकांनी अर्जही दाखल केले आहेत. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सर्व पक्षांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. मात्र, काँग्रेसने याबाबतीत तरी इतर सर्व पक्षांना मागे टाकले आहे. पक्षाने बंडखोरीचा विचार न करता अधिकृत उमेदवारांची पहिली यादी आज सोशल मीडियातून जाहीर केली आहे.
काँग्रेसने ८७ उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये पक्षाचे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे आणि आमदार अस्लम शेख यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काही माजी नगरसेवक आणि पक्षाच्या प्रमुख मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही यादीत भरणा आहे. पहिल्या यादीत मुस्लिम उमेदवारांची संख्याही लक्षणीय आहे.
मुंबई काँग्रेसने सोशल मीडियातून ही यादी जाहीर करत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, अद्याप मित्रपक्ष असलेल्या वंचितकडून अद्याप एकाही उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नाही. या आघाडीत वंचितच्या वाट्याला ६० हून अधिक जागा आल्या आहेत. या आघाडीमुळे ठाकरेंना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि वंचितमधील जागावाटपावरून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड नाराज असल्याची चर्चा होती. पण ही चर्चा त्यांनी फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझी आणि बाळासाहेब आंबेडकर यांची नाळ एक आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनुयायी आहे. देशात लोकशाही टिकवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र आले पाहिजे, ही माझी विनंती होती. त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबांनी आघाडी केली. मी त्यांची आभारी आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत आम्ही लवकरच एकत्र जाहीरनामा देखील मांडणार आहोत. प्रकाश आंबेडकर आणि आम्ही एका विचारधारेचे आहोत, आम्ही बाबासाहेबांना मानणारे आहोत. संविधान हा आमचा धागा आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तिथे एकीकडे धार्मिक तणाव निर्माण केला जातो, जातीयवाद केला जातो तर दुसरीकडे आज काँग्रेस आणि वंचित आघाडी झाली आहे. आम्ही मुंबईकरांच्या प्रश्नासाठी, हक्कासाठी लढणार आहोत, असे गायकवाड यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.