BMC Election News Sarkarnama
मुंबई

Mahayuti News : हा अपमान मी सहन करणार नाही! केंद्रीय मंत्री महायुतीवर प्रचंड संतापले, आज घेणार मोठा निर्णय...

Ramdas Athawale Mahayuti : मुंबईप्रमाणेच पुण्यातही रिपब्लिकन पक्षाला जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करून न घेतल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.

Rajanand More

Seat sharing dispute : राज्यात महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपत आली असली अजून हा घोळ सुरूच आहे. त्यामुळे बहुतेक पक्षांना नाराजीनाट्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले महायुतीच्या भूमिकेवर प्रचंड संतापल्याचे समोर आले आहे.

रामदास आठवले हे मुंबई महापालिकेतील महायुतीच्या जागावाटपावरून नाराज असल्याचे समोर आले आहे. आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित जागा मिळत नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी चांगलेच संतापले आहेत. आठवले यांनीही आपला संताप आत सोशल मीडियातून व्यक्त करत महायुतीला इशारा दिला आहे.

सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये आठवले यांनी म्हटले आहे की, महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत, मात्र आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी ४ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही.

हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल, असा इशारा आठवले यांनी दिला आहे.

मुंबईप्रमाणेच पुण्यातही रिपब्लिकन पक्षाला जागावाटपाच्या चर्चेत सहभागी करून न घेतल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. काल काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर आंदोलन करत आपली नाराजीही व्यक्त केली होती. राज्यासह केंद्रात आठवलेंचा पक्ष एनडीएमध्ये आहे. ते केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. मात्र, महापालिकेच्या जागावाटपामध्ये महायुतीत त्यांच्या पक्षाचा विचारच केला जात नसल्याची सध्याची स्थिती असल्याचे त्यांच्या नाराजीवरून स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT