Narayan Rane and Nitesh rane
Narayan Rane and Nitesh rane  Sarkarnama
मुंबई

राणे पिता-पुत्र अडचणीत; अटकेचा फैसला उद्या होणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन (Disha Salian) प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या प्रकरणी केलेल्या विधानावरून ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालय उद्या (ता.16) फैसला सुनावणार आहे. (Disha Salian case news updates)

मुंबईतील दिंडोशी न्यायालयात राणे पिता-पुत्रांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज पूर्ण झाली आहे. या प्रकरणी उद्या न्यायालय निर्णय सुनावणार आहे. आज यावर न्यायालयात अडीच तास सुनावणी झाली. नारायण राणे यांच्या वतीने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. उद्या सकाळी 11.30 वाजता जामिनाबाबतचा निकाल न्यायालय देणार आहे. यामुळे राणे पिता-पुत्रांना अटक होणार की नाही, याचा निर्णय उद्याच होणार आहे.

दिशा सॅलियन हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे आणि नितेश राणे यांनी केला आहे. या प्रकरणी राणे पिता-पुत्रांवर मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एकदा हा मुद्दा उकरून काढल्यामुळे राणेंच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणेंना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली होती. हे दोघेही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर झाले होते. नंतर त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली.

शिवसेना नेत्या व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्याची बदनामी करण्याची तक्रार केली होती. यानंतर मालवणी पोलीस ठाण्यातून महिला आयोगाने दिशा सॅलियन प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्यात दिशा सॅलियनच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा समावेश आहे. दिशा सॅलियनवर बलात्कार झाल्याचा शवविच्छेद अहवालामध्ये उल्लेख नाही. यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्यावर महिला आयोगाने खोटे आरोप केल्याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर नारायण राणे अडचणीत आले होते. तर नितेश राणे हे देखील संतोष परब हल्ल्यानंतर अडचणीत आले होते. आता तर दिशा प्रकरणामुळे राणे पिता-पुत्र अडचणीत आलेत. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी राणेंनी थेट राज्यातील एका युवा मंत्र्यावर अप्रत्यक्ष आरोप केले आहेत. त्यामुळे आता दिशाबाबत केलेले वक्तव्य राणेंना भोवणार का? आणि त्यांना अटक होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT