मोठी घडामोड : केंद्रीय निरीक्षकांची निवड अन् लगेचच सावंत दिल्लीत

गोव्यात भाजपसमोर मुख्यमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला असून, राजकीय हालचालींना वेग आला आहे.
PM Narendra Modi and Pramod Sawant
PM Narendra Modi and Pramod SawantSarkarnama

पणजी : गोव्यात भाजपने पुन्हा सत्ता ताब्यात राखण्यात यश मिळवले आहे. असे असले तरी मुख्यमंत्रिपदाचा तिढा पक्षासमोर निर्माण झाला आहे. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. गोव्यासाठी भाजप नेतृत्वाने केेंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि एल. मुरूगन यांना निरीक्षक नेमले आहे. या निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. याआधी सावंत दिल्लीला रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना अशी भाजपची स्थिती झाली आहे. भाजपने केंद्रीय निरीक्षकांना राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निरीक्षक राज्यात येत असताना प्रमोद सावंत (Pramod Sawant) मात्र, दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रमोद सावंत हे आज दुपारी पणजीतून दिल्लीला रवाना झाले. या वेळी बोलताना ते म्हणाले, केंद्रीय निरीक्षक राज्यात येत आहेत. यानंतर आमदारांची बैठक घेऊन चर्चा केला जाईल. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेता निवडला जाईल. यानंतर सरकार स्थापना होईल. मी आज दिल्लीला जात आहे.

गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी अद्याप घेतलेला नाही. यामुळे मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर करण्याआधीच भाजपने आमदारांचा शपथविधी उरकून घेतला आहे. प्रमोद सावंत यांना पुन्हा संधी न देता दुसऱ्या व्यक्तीची निवड केली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू असताना त्यांना दिल्लीला पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी विश्वजित राणे हे स्पर्धेत आहेत. असे असले तरी भाजप नेतृत्व धक्कातंत्राचा वापर करून इतरही कुणाकडे धुरा सोपवू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

PM Narendra Modi and Pramod Sawant
भाजप जिंकताच लखीमपूर खीरीतील साक्षीदारावर हल्ला; सरन्याधीशांनी घेतली गंभीर दखल

आमदारांचा शपथविधी

गोव्यात मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम असताना राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्ले यांनी आज विधानसभेचे अधिवेशन बोलावले. या अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून आमदार गणेश गावकर यांची निवड केली आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली आहे. मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने आधी आमदारांना शपथ देण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पक्ष नेतृत्वाकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावावर खल सुरू आहे. मात्र, अद्याप निर्णय होत नसल्याने आमदारांच्या शपथविधीचा निर्णय घेण्यात आला.

PM Narendra Modi and Pramod Sawant
दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं! नाना पटोलेंचा खोचक सल्ला

गोव्यात (Goa) विधानसभेच्या ४० पैकी २० जागा भाजपला (BJP) मिळाल्या आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. यामुळे भाजपने गोव्यात बहुमताचा आकडा गाठला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून गटबाजी उफाळली आहे. विश्वजित राणे (Vishwajit Rane) हे आरोग्यमंत्री होते. राणे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या आहेत. सावंत यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. यानंतर काही वेळाने राणे हे थेट राज्यपालांना जाऊन भेटले होते. ही भेट व्यक्तिगत स्वरूपाची असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, या भेटीबद्दल भाजप नेत्यांना काहीही माहिती नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com