Mumbai- goa Expressway : Sarkarnama
मुंबई

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्ग की मृत्यूचा सापळा ? महामार्गावर तब्बल इतके मृत्यू ....

Sudesh Mitkar

संजय परब

Mumbai News : समृद्धी महामार्ग धावू लागला तरी त्याआधी म्हणजे १२ वर्षांपूर्वी सुरू झालेला मुंबई गोवा महामार्ग अजूनही पूर्ण होताना दिसत नाही. आतापर्यंत फक्त ६७ टक्के काम झाले असून ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे वास्तव समोर येत आले आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडलेत. सर्वात भयंकर म्हणजे गेल्या १० वर्षांत या महामार्गावर २०१० जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे आणि ही निर्लज्ज कबूली सरकारने दिली आहे. सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने लेखी उत्तरात ही कबुली दिलीय. 

श्रीरामाला जेवढा वनवास सहन करावा लागला तितकाच कोकणवासियांच्या नशिबी या महामार्गामुळे तो आलाय. या महामार्गावरील रस्त्याची अवस्था आणि त्यावरील खड्डे याची वारंवार चर्चा होत असते. या मार्गावरुन प्रवास करणारे नागरिक या रस्त्याच्या अवस्थेबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करत असतात. याविरोधात सातत्याने आंदोलन, उपोषणे झाली. हायकोर्टात सरकारविरोधात याचिका सुद्धा दाखल करून झाल्या. पण, थातुरमातुर उत्तर देऊन सरकारने कायम या प्रश्नावर पळ काढला आहे. फक्त गणपती हा कोकणातला सर्वात मोठा सण आला की सरकारला या रस्त्याची आठवण येते. पाहणीचे नाटक झाले आणि सण संपला की पुन्हा तेच दुर्दैवाचे दशावतार कोकणवासियांच्या नशिबी येतो.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)      

सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारच्या पार गेली असताना जबर जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या ५ हजारच्या वरआहे, हे माहितीमधून समोर आले आहे. हे जखमी म्हणजे धड जगता येत नाही की मरण मिळत नाही, अशा दुष्टचक्रात अडकले आहेत. गंभीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने मृत्यू आणि कायमचे जायबंदी होऊनही एक पैशाची मदत या लोकांना मिळलेली नाही. घोषणा होऊन चार एक वर्षांत बांधल्या गेलेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत मिळत असताना मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्त वाऱ्यावर पडले आहेत. 

एनएच ६६ म्हणून ओळखला जाणारा हा महामार्ग ४७१ किलोमीटरचा असून बांधकामासाठी  त्याची ११ पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी ६७ टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. मात्र त्याचा दर्जा चांगला नसल्याचे पाहणीत दिसून आले आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला असला तरी ठेकेदारांना वेसण घालण्यात त्यांना अजून यश आलेले नाही. मुख्य म्हणजे कामाच्या दर्जाबाबत त्यांना खडसावून प्रसंगी अशा ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची तयारी चव्हाण यांनी दाखवली पाहिजे, अशी मागणी मुंबई गोवा महामार्ग आक्रोश समितीने केली आहे.

या महामार्गावर भाष्य करताना केंद्रीय रस्ते बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी 'हा मार्ग झाला नाही त्याला मी जबाबदार असून यासाठी मी इतर कोणालाही जबाबदार धरणार नाही’,अशी गर्जना केली होती. मात्र हा रस्ता महाराष्ट्र सरकारकडे देऊन त्यांनी मोठी चूक केलीय, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले आहे.  या रस्त्यासाठी त्यांनी ८० बैठका घेतल्या. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. सर्व भारतात मला रस्ते बांधण्यासाठी त्रास झाला नाही, पण मुंबई गोवा महामार्ग मला दिलेल्या वेळेत पूर्ण करता आला नाही, याचे मला दुःख आहे, असा हातशपणा सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय. यासाठी त्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या लोकप्रतिनिधींचे कान टोचले होते. पण, त्याचा सुद्धा काही उपयोग झाला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT