Mumbai News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मुंबई महापालिकेत भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काठावरचे बहुमत मिळाले. त्यामुळे आता महापौर भाजपचा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या एकसंध शिवसेनेला दूर ठेवत मुंबईत आता भाजपचा महापौर विराजमान होणार आहे. भाजपने मुंबईचा महापौर निवड करताना मोठी खेळी केली आहे. अत्यंत सूक्ष्म राजकीय गणिते आखत त्यांनी घाटकोपरमधील भाजपच्या अनुभवी आणि आक्रमक नगरसेविका रितू तावडे यांची निवड केली आहे. त्यांची निवड करण्यामागे पाच मोठी गुपिते आहेत.
भाजपची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Amit Satam) यांनी महापौर पदाच्या नावाची घोषणा केली. रितू तावडे यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती करताना भाजपने मोठे प्लॅनिंग केल्याचे दिसते. त्यांच्या निवडीमागे सूक्ष्म राजकीय गणिते आहेत. विशेषतः उआहदव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून भाजप सत्तेत आल्यास मुंबईचा महापौर हा अमराठी असणार असल्याची टीका केली जात होती. मात्र, रितू तावडे यांची निवड करून भाजपने या दाव्यातील हवाच काढली आहे.
ठाकरे बंधूंच्या दाव्यातील हवाच काढली
निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ठाकरे बंधूकडून भाजपचा (BJP) महापौर अमराठी असेल असा प्रचार केला जात होता. मात्र, रितू तावडे या मराठी असल्याने त्यांच्या रूपाने एक खंबीर मराठी चेहरा भाजपने महापौरपदाच्या शर्यतीत उतरवला आहे. रितू तावडे या स्वतः मराठा समाजातील असून एक खंबीर मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे त्यांच्या निवडीने भाजपने विरोधकांकडून केल्या जात असलेल्या दाव्यातील हवाच काढली आहे.
सर्वाधिक प्रशासकीय अनुभव
नगरसेवक पदाच्या दोन टर्ममध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ राहिली आहे. घाटकोपर हा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असून तिथे त्यांनी केलेली बांधणी पक्षाला अधिक मजबूत करणारी ठरली आहे. महिला आरक्षण असल्याने पक्षाकडे इतरही नावे होती, परंतु रितू तावडेंचा प्रशासकीय अनुभव सर्वाधिक असल्याने भाजपने त्यांची निवड केली.
मराठी-गुजराती मतदारांची सहानुभूती
रितू तावडे या मराठी असून सलग दुसऱ्यांदा नगरसेवक झाल्या आहेत. घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक 132 मधून त्या निवडून आल्या आहेत. त्यांचा वार्ड हा गुजराती बहुल आहे. भाजपसाठी हा सर्वात मोठा मास्टरस्ट्रोक आहे. यामुळे पक्षाला मराठी मतदारांची सहानुभूती मिळेलच. पण गुजराती मतदारांमध्येही आपला प्रतिनिधी सर्वोच्च पदावर असल्याचा विश्वास निर्माण होणार आहे. हे समीकरण येत्या काळात होत असलेल्या निवडणुकांसाठी भाजपसाठी फायद्याचे ठरणार आहे.
प्रभावी कामगिरीचा झाला फायदा
रितू तावडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद प्रभावीपणे भूषवले आहे. महापालिकेतील गुंतागुंतीचे विषय आणि प्रशासकीय कामकाज हाताळण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कारकिर्दीत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ठेवलेला वचक यामुळे त्या एक अभ्यासू नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.
आक्रमक वक्तृत्वशैली
महापालिकेच्या सभागृहात विरोधकांच्या टीकेला प्रतिउत्तर देण्यासाठी भाजपला एका कणखर नेतृत्वाची गरज होती. रितू तावडे या केवळ अनुभवीच नाहीत, तर त्या आक्रमक वक्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. त्यामुळे तावडे यांच्या रूपाने ती पूर्ण होणार आहे. त्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.