Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Mumbai Budget 2024 : BMC बजेटमध्ये 'शिंदेशाही', ठाकरेंना 'दे धक्का'

Jui Jadhav

Mumbai Municipal Corporation Budget Latest News in Marathi :

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा बारच उडवला आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प अनेक अर्थांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजकीय हादरे देणारा आहे. मुंबई महापालकेतील ठाकरेंचे वर्चस्वच समूळपणे उखडून टाकण्याचा चंग बांधल्याचे यातून दिसत आहे. याची सुरुवात महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रथमच धर्मवीर Anand Dighe यांच्या नावाने योजना घोषित करून झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी मुंबई महापालिकेकडून 507.98 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात प्रथमच धर्मवीर आनंद दिघेंच्या नावाचा उल्लेख आला आहे. या अर्थसंकल्पातून एक प्रकारे ठाण्याचे आणि आता राज्याचे किल्लेदार असलेल्या एकनाथ शिंदेंनी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून योजनेंचा पाऊस पडला आहे. अर्थसंकल्पाच्या पहिल्या 5 पानांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या योजनांचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री संपूर्ण स्वछता मोहीम, मुंबई सुशोभीकरण प्रकल्प, मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन, मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन अशा योजनांचा अर्थसंकल्पात समावेश आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून योजनांचा पाऊस पाडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. एकूण मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाला यातून मोठे आव्हान देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

मुंबई महापालिकेतील कंत्राट देण्यावरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंसह संजय राऊत आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी अनेक गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केले. भ्रष्टाचाराचेही आरोप केले. पण एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील स्वच्छता मोहीमेत स्वतः जातीने लक्ष घातले. तसेच कोस्टल रोड, न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक या मोठ्या प्रकल्पांना गती देण्याचे प्रयत्न केले. मुंबईचे सुशोभीकरणही सुरू केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटात अस्वस्थता!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामे आणि पायाभूत सुविधांच्या योजनांचा धडाका लावला आहे. ही बाब ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण करणारी आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील माजी नगरसेवकांनाही आपल्याकडे खेचण्यात यश येत आहे. आतापर्यंत 33 माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. येत्या काळात आणखी काही माजी नगरसेवकांना गळाला लावत ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT