Election Flying Squad Attack Sarkarnama
मुंबई

Election Flying Squad Attack : निवडणूक पथकावर हल्ला, मुंबईतील घटनेनं खळबळ

Mumbai Municipal Election: Flying Squad Attacked, Govt Work Obstructed : मुंबई महापालिका निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकावर कारमधील प्रवाशाने पाठलाग करत हल्ला केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे.

Pradeep Pendhare

Mumbai Municipal Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विलेपार्ले इथल्या मिलन सबवे परिसरात वाहनांची तपासणी करणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकावर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली.

निवडणूक आयोगाच्या कर्तव्यावर असताना सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे आणि मारहाण केल्याप्रकरणी विलेपार्ले पोलिस ठाण्यात प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे महापालिकेकडून सांगण्यात आले.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Election) पालिकेच्या ‘के पूर्व’ विभागातील कनिष्ठ अवेक्षक सुरेश जानू राठोड यांची नियुक्ती नोडल अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. राठोड आणि त्यांचे पथक रविवारी पहाटे 1.25 वाजण्याच्या सुमारास मिलन सबवे इथल्या पोलिस बीट चौकी क्रमांक एकसमोर वाहनांची तपासणी करीत होते.

या वेळी एक पांढऱ्या रंगाची कार तपासणीसाठी थांबवण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार व्हिडिओग्राफर धीरज पांचाळ या तपासणीचे चित्रीकरण करीत होते. या वेळी कारच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाने ‘व्हिडिओ शूटिंग का करताय?’ असा प्रश्न करून वाद घालण्यास सुरुवात केली.

कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही निवडणूक आयोगाचे (Election Commission) काम करीत आहोत,’ असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र संतापलेल्या प्रवाशाने कारमधूनच व्हिडिओग्राफर पांचाळ यांना मारहाण केली. मग त्याने कारमधून उतरून आरडाओरडा करीत व्हिडिओग्राफरचा पाठलाग केला आणि त्याला पकडून मारहाण केली.

नोडल अधिकारी सुरेश राठोड मध्यस्थी करण्यासाठी गेले असता, आरोपीने त्यांच्या अंगावर धावून जात त्यांनाही ढकलून दिले. ‘तुम्हाला बघून घेतो,’ अशी धमकी देत त्याने निवडणूक प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण केला. पथकाने विचारपूस केली असता संबंधित व्यक्तीने आपले नाव इफ्तिकार अहमद मोहम्मद अहमद असल्याचे सांगितले. या घटनेनंतर सुरेश राठोड यांनी विलेपार्ले पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

महापालिकेच्या माहितीनुसार, ​पोलिसांनी इफ्तिकार अहमदविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश भरत माने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT