Mumbai News, 17 Jan : 'प्रचंड गोंधळ आणि अनागोंदीत मुंबईसह 29 महानगरपालिकांचे निकाल लागले आहेत. रात्री उशिरापर्यंत मतमोजणीचा गोंधळ सुरूच आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराकडे भारताचे लक्ष लागले होते. प्रचंड भ्रष्टाचार, शाई घोटाळा, ईव्हीएम घोटाळा, पैसे वाटप, बोगस आणि दुबार मतदानाच्या ताकदीवर उद्योगपती अदानी यांचा भाजपच्या मदतीने मुंबईवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.'
अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यात आला आहे. काल मुंबई महापालिकेचा निकाल जाहीर झाला. यानिकालात २२७ पैकी भाजपला ८९ तर शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या. तर ठाकरेंची शिवसेना ६५ आणि मनले ६ जागांवर विजयी झाली. त्यामुळे आता महापालिकेत महायुतीची निर्विवाद सत्ता आली आहे. त्यामुळे ठाकरेंचे पालिकेवरील वर्चस्व गेलं आहे.
याच सर्व पार्श्वभूमीवर आणि आयोगाच्या भूमिकेवर सामनातून टीकास्त्र डागलं आहे. सामनात लिहिलं की, 'संपूर्ण निकाल येण्याआधीच भाजपने सुरू केलेला जल्लोष हा निवडणूक घोटाळ्याचाच भाग आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी हा धोक्याचा इशारा आहे. सत्ता, पैसा आणि निवडणूक आयोग हरकाम्याची भूमिका बजावत असेल तर निवडणुकीत कोणाही ऐऱ्यागैऱ्याची लाट येऊ शकते. या लाटांना आणि लहरींना काहीच अर्थ नसतो. मुंबईसह 26 महानगरपालिकांत भाजपची लाट आली व त्या लाटेवर ‘शहासेना’सारखे ‘हवशे-गवशे’ किनाऱ्याला लागले.
‘ना विचार ना भूमिका’ हेच सूत्र असल्याने यापुढे कोणत्याही निवडणुकांना अर्थ राहणार नाही. भाजप आणि शहासेनेने शंभरचा टप्पा पार केला. शिवसेना-मनसेने जोरात झुंज दिली, मुसंडी मारली, पण निवडणूक आयोग व सत्तेच्या मनमानीने घात केला. शेकडो मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता आला नाही व हे सर्व अधःपतन बघत निवडणूक आयोग अजगरासारखा पडून राहिला,' अशा शब्दात आयोगावर आसूड ओढला आहे.
तर मतदारांना पैशांची चटक लावून संपूर्ण निवडणुकीवरच ताबा मिळवण्याचे तंत्र म्हणजे लोकशाही अशी नवी व्याख्या आता निर्माण झाली आहे. मतदान संपून 24 तास उलटले तरी मतदानाची टक्केवारी आयोग आणि पालिका आयुक्त देऊ शकले नाहीत, पण मतदार रांगेत उभे असताना भाजपच्या सोयीचे एक्झिट पोल वृत्तवाहिन्यांवर झळकले हा आचारसंहिता भंगाचा नवा चमत्कार जनतेने पाहिला.
निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी ‘भाजप अॅप’चा उघड वापर करत होते. निवडणूक अधिकारी मतदान केंद्रांवर बसून उघडपणे भाजपला मदत करत होते व त्याबाबतच्या तक्रारींची दखल निवडणूक आयोग घेत नसेल तर यापुढे निवडणुका न घेता सरळ नेमणुका करून आमदार, खासदार व नगरसेवकांना सभागृहात पाठवावे. इतक्या किळसवाण्या पद्धतीने मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या.
मराठी माणसाच्या नाकावर टिच्चून मुंबईत ‘अदानी’धार्जिणा महापौर बसवायचे महाराष्ट्रद्रोही स्वप्न भाजपने पाहिले. ते पिसाळ, खोपड्यांची अवलाद मिंध्यांच्या मदतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला, याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्याकुट्ट शाईने कायमची लिहिली जाईल. 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मराठी माणसाने मिळवलेल्या मुंबईचा घास शिंद्यांसारख्या मिंध्या माणसाच्या बेइमानीमुळे हातचा जाण्याची वेळ आली, पण आम्ही ते होऊ देणार नाही, असंही सामनात म्हटलं आहे.
भाजप व त्यांच्या मिंध्यांनी जिंकलेल्या जागा जर चोरून, विकत घेऊन मिळवल्या असतील तर मुंबई विकण्याची आणि विकत घेण्याची योजना मिंध्यांच्या मदतीने तडीस नेण्याचा गौतम अदानी, अमित शहा व त्यांच्या भाजपचा प्रयत्न आहे हे स्पष्ट आहे. ठाण्यात मिंधे, छत्रपती संभाजीनगरात भाजप, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, जळगाव, धुळे येथे भाजपने महापालिका ताब्यात घेतल्या. अजित पवारांचे घड्याळ बंद पडले. लातुरात काँग्रेस-वंचितने सत्ता मिळवली. मराठवाड्यातील परभणीवर शिवसेना-काँग्रेसचा विजयी ध्वज फडकला ही आनंदाची बाब आहे.
काँग्रेस व वंचितने या निवडणुकांत सवतासुभा केला, पण मुंबईत त्यांना 25 चा पल्लाही पार करता आला नाही. डॉ. आंबेडकर हे अखंड महाराष्ट्राचे व मुंबई मराठी माणसाच्याच हाती राहावी या ठाम मताचे होते. त्यांचे राजकीय वारसदार प्रकाश आंबेडकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. काँग्रेस-वंचित आघाडीने लातूर सोडले तर मोठे यश मिळवले नाही. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोल्यात भाजपने मुसंडी मारली हे चित्र विचार करायला लावणारे आहे, असं म्हणत त्यांनी वंचितच्या भूमिकेवर देखील शंका उपस्थित केली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचा भ्रष्ट, मस्तवालपणा सगळ्यांनाच गिळत आहे. सगळ्यांना गिळून झाल्यावर तो मुंबईचा व नंतर विदर्भाचा घास घेईल. भाजपच्या विजयाचा गुलाल उधळत जे मराठी मिंधे आज नाचत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्या बरबाद करायला हातभार लावला आहे. पैशांचा वापर भाजप व मिंध्यांनी केला. या हरामाच्या पैशांवर महाराष्ट्राच्या व मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. छत्रपती शिवरायांचे हे राज्य. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी येथल्या फाटक्या मराठी माणसाला स्वाभिमान व अस्मितेचे बाळकडू दिले.
त्या बाळकडूत विष मिसळण्याचे काम भाजपच्या मिंध्यांनी केले. यापुढे महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे, मुंबई शहराचे भवितव्य काय? येथील मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईवर होणारे आक्रमण आणि अतिक्रमण रोखायचे कोणी? मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे येणारा काळच देईल, पण ज्यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पीछेहाटीस हातभार लावला.
त्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला. मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना व मनसेने झुंज दिली, शर्थ केली. अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. मुंबई व मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही, असं लिहित सामनातून मुंबई पालिकेच्या निकालावरून भाजप आणि शिंदेसेनेवर हल्लाबोल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.