Hemant Nagrale
Hemant Nagrale 
मुंबई

डान्सबार पडला महागात! पोलीस आयुक्तांकडून बदली न करता वरिष्ठ निरीक्षकाचे थेट निलंबन

सरकारनामा ब्युरो

अंधेरी : अंधेरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय बेळगे (PI Viaja Belge) यांच्यावर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी आज थेट निलंबनाची कारवाई केली. डान्स बारप्रकरणी (Dance Bar) ही कारवाई करण्यात आली आहे. बदली न करता बेळगे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

लॉकडाउन लागू असताना जुलै महिन्यात ठाण्यातील एक डान्स बार सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल गृह विभागाने घेतली होती. त्यावेळी काही पोलिसां‍सह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतर डान्स बार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर सक्त कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते.

मागील महिन्यात अंधेरीतील एका डान्स बारमध्ये अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या विशेष पथकाने कारवाई केली होती. तेव्हा २५ हून अधिक बारबालांना ताब्यात घेण्यात आले होते. त्याचवेळी विजय बेळगे यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली होती. मात्र, सहपोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या शिफारशीवरून बेळगे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केली. यापूर्वीही लॉकडाऊनदरम्यान डान्स बार सुरू असल्या प्रकरणी पोलिसांवर कारवाई झाली होती.

दरम्यान, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर हेमंत नगराळे यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. त्यांनी नव्या कार्यपद्धतीनुसार आर्थिक गुन्हे शाखेत (ईओडब्ल्यू) चार वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. साडेसहा कोटींहून अधिक रकमेचे आर्थिक गुन्हे, बँकिंग फसवणूक, आर्थिक गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेत चार वर्षांपासून काम करणारे अनेक अधिकारी आहेत. सामान्यतः तीन वर्षांपर्यंत अधिकारी एखाद्या विभागात कार्यरत राहतात; पण आर्थिक गुन्हे शाखेत सहा वर्षांहून अधिक कालावधीपासून काम करणारे काही अधिकारी कार्यरत आहेत. त्यांची सर्वांची पोलिस ठाणी आणि कमी महत्त्वाच्या ठिकाणांवर बदली करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT