Mumbai News, 01 September : मालवण (Malvab) येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी (ता.01 सप्टेंबर) महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलना सुरुवात होण्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. शिवाय महाविकास आघाडीच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नसल्याच्या मुद्द्यावरून राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्राचे खलनाय असल्याची बोचरी टीकाही केली. संजय राऊत म्हणाले, "भाजपला आंदोलन करायचं असेल तर करु द्या. आमचं आंदोलन हे शिवरायांच्या सन्मानासाठी आहे. तुम्ही जो भ्रष्टाचार केला त्या विरोधात आम्ही विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करू शकत नाही का? शिवरायांसाठी आंदोलन करणाऱ्यां विरोधात भाजप रस्त्यावर उतरली आहे. आम्ही शिवरायांच्या सन्मानासाठी रस्त्यावर उतरतोय. तर भाजप आमच्या विरोधात म्हणजे शिवरायांच्या विरोधात आंदोलन करत आहे."
तसेच पंतप्रधानांनी माफी मागून हा प्रश्न सुटणार नसल्याचंही राऊत म्हणाले. पंतप्रधान मोदींनी माफी मागितली असेल. पण माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही. आता महाराष्ट्राला जर त्यांच्या भावना मांडायच्या असतील तर तुम्ही थांबवू शकत नाही. लोकशाहीमध्ये आंदोलनाला परवानगी द्यावी लागते, तुम्ही परवानगी देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे. आम्ही किमान जोडे तरी मारतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, अशा शब्दात राऊतांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
आमच्या आंदोलनाला अडवण्याचा प्रयत्न झाला तरीही आम्ही आंदोलन करणार, मग आम्हाला अटक केली तरी चालेल. आमच्या बसेस थांबवण्याचा प्रयत्न सकाळपासून सुरु आहे. मुंबईत (Mumbai) कार्यकर्ते आंदोलनाला पोहचू नयेत म्हणून मुद्दामहून मेगाब्लॉक वाढवला. आमच्या आंदोलनाची एवढी भीती सरकारला वाटत आहे का? असा सवाल करत या सर्वांचे सुत्रधार देवेंद्र फडणवीस असल्याचं राऊत म्हणाले.
दरम्यान, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. तरीही ते रोखण्याचा प्रयत्न होतोय. आम्हाला अटक केली तरीही आम्ही मागे हटणार नाही, फडणवीस तुम्ही आम्हाला अटक करा. तुम्हाला हेच करायचं आहे. महाराष्ट्राचे खलनायक देवेंद्र फडणवीसच आहेत, अशा शब्दात त्यांनी गृहमंत्र्यांवर टीकास्र डागलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.