Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

मलिकांच्या विरोधात वानखेडेंची तक्रार अन् मुंबई पोलिसांनी नोंदवला जबाब

समीर वानखेडे यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. या विरोधात वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. वानखेडेंनी केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपास सुरू केला असून, त्यांचा जबाब नोंदवला आहे.

मलिक यांनी आरोप करताना वापरलेल्या बोगस शब्दाला वानखेडे यांनी आक्षेप घेतला आहे. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उल्लेख मलिक यांनी बोगस असा केला, असे वानखेडेंनी तक्रारीत म्हटले आहे. अॅट्रासिटी कायद्यांतर्गत ही तक्रार असल्याने याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून केला जातो. गोरेगाव पोलिसांकडे या प्रकरणी वानखेडेंनी तक्रार नोंदवली आहे.

वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. गोरेगाव विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांचे पद सध्या रिक्त असल्याने बोरीवली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे हा तपास सोपवण्यात आला आहे. हा तपास बोरीवली विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त रेखा भवरे करीत आहेत. त्यांनी या प्रकरणी वानखेडे यांचा जबाब नोंदवला आहे. त्यांचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाऊ शकतो.

वानखेडे यांनी दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली होती. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. या भेटीनंतर वानखेडे म्हणाले होते की, माझ्याकडील कागदपत्रे मी आयोगासमोर सादर केली आहेत. माझ्या तक्रारीची खातरजमा लवकरच केली जाईल आणि त्यावर आयोगाचे अध्यक्ष उत्तर देतील. यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT