Mumbai kidnapping Case : दुपारी 1.45 ची वेळ... मुंबई पोलिसांचा फोन खणाणला... 20 ते 25 लहान मुलांना ओलीस ठेवल्याचा कॉल... सर्व यंत्रणा हादरते अन् तातडीने सुत्रं हलवली. सर्व टीम घटनास्थळी दाखल होतात. मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीशी पोलिसांकडून वाटाघाटी सुरू केल्या जातात. यादरम्यान पालक व रहिवाशांच्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. अडीच ते तीन तासाच्या थरारानंतर मुलांची सुखरुप सुटका होते...
मुंबईतील पवई येथे गुरूवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. पवईतील महावीर क्लासिक नावाच्या इमारतीमध्ये लहान मुलांना एका वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी स्टुडिओत बोलविण्यात आले होते. मागील तीन-चार दिवसांपासून या ऑडिशन्स सुरू होत्या. निवड झालेल्या 17 मुलांना आज पुन्हा बोलविण्यात आले होते. त्यांनाच रोहित आर्या या व्यक्तीने डांबून ठेवले होते.
मुले जेवणाच्या वेळेत बाहेर आली नाहीत, त्यामुळे संशय आला. तसेच इमारतीला असलेल्या काचेवर काही मुले हात मारून मदतीचे आवाहन करत असल्याचे स्थानिकांना दिसून आले. त्यांनी तातडीने दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांना ही माहिती दिली. पोलिस, अग्निशमन दल, बॉम्बशोधक पथक यांसह सर्व यंत्रणा याठिकाणी दाखल झाल्या. दरम्यानच्या काळात आरोपीचा स्टूडिओ पेटवून देण्याची धमकी देणारा व्हिडीओ समोर आला. त्यामुळे यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. पोलिसांनी तातडीने ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीसोबत वाटाघाटी सुरू केल्या. पण त्याच्या मागण्या समोर आल्या नाहीत.
एकीकडे वाटाघाटी सुरू असताना पोलिसांच्या दुसऱ्या टीमने एका स्थानिक तरुणाच्या मदतीने स्टुडिओच्या बाथरूममधून आत प्रवेश केला. त्यानंतर रोहित आर्य या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. यावेळी स्टुडिओमध्ये 17 लहान मुले, एक ज्येष्ठ महिलेसह आणखी एका स्थानिकाचा समावेश होता, अशी माहिती पवई पोलिसांनी दिली.
दरम्यान, आरोपीने मुलांना का डांबून ठेवले होते, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याच्या मागण्या अद्याप समजल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या स्टुडिओमध्ये एक एअरगन आणि काही रसायने आढळून आली आहेत. पोलिसांकडून स्टुडिओची तपासण केली जात असून आरोपीला रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.