Mumbai Rain Deaths Sarkarnama
मुंबई

Mumbai Rain Deaths : मुंबईत पावसाचा कहर; आठवडाभरात 8 हून अधिक जणांचा मृत्यू, झाडे कोसळणे ते पूरस्थितीने वाढवली चिंता, उद्या शाळांना सुट्टी

Heavy rain wreaks havoc across Mumbai, Thane, Bhiwandi and Raigad; over eight dead as IMD issues fresh alert : मुंबई, भिवंडी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा फटका; झाडे कोसळणे, उघडी मॅनहोल्स, नदीपात्रातील दुर्घटना आणि जलमय भागांमुळे जनजीवन विस्कळीत

Pradeep Pendhare

Mumbai Rain News : मुंबईसह ठाणे, भिवंडी आणि रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मुंबईत अवघ्या एका आठवड्यात घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आठहून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, झाडे कोसळणे, उघडी मॅनहोल्स, पूरस्थिती आणि नदीपात्रातील दुर्घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्याने मुंबई, नवी मुंबई शहरासह उपनगर आणि कोकणातील शाळांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) चेंबूर परिसरात एका शाळेच्या बसवर अचानक महाकाय झाड कोसळले. बसमध्ये शाळकरी मुले असताना घडलेल्या या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक मुले जखमी झाली. या घटनेनंतर शहरातील धोकादायक झाडांच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित झाले.

याचदरम्यान, कुर्ल्यातील साकीनाका परिसरात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) उघड्या मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पावसाळ्यात रस्त्यांवरील सुरक्षाव्यवस्थेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. 5 जुलै रोजी कुर्ल्यातील नौपाडा परिसरात मुसळधार पावसादरम्यान एका दुकानावर मोठी झाडाची फांदी कोसळली. या दुर्घटनेत परिसरात उपस्थित असलेले युनूस कुंडावाला (वय 63) यांचा मृत्यू झाला.

शॉर्ट सर्किटच्या आणि झाडे उन्मळली

त्याआधी 4 जुलै रोजी गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील युनिट क्रमांक 13 येथे आणखी एक दुर्दैवी घटना घडली. हसन रझा जहांगीर आलम सय्यद (वय 18) हा मित्रांसोबत दुचाकीवरून जात असताना अचानक झाडाची मोठी फांदी त्याच्या डोक्यावर कोसळली. गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. या पावसाळी कालावधीत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये 250 हून अधिक झाडे उन्मळून पडल्याची नोंद झाली आहे. तसेच 15 हून अधिक ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटनाही घडल्या असून, अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला.

भिवंडीतील दोघांचा नदीत बुडून मृत्यू

दरम्यान, भिवंडी शहरालगत वाहणाऱ्या कामवारी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या विसर्जन घाट, म्हाडा कॉलनी, संगमपाडा आणि ईदगाह परिसरात पाणी शिरले. या पूरस्थितीत म्हाडा कॉलनीतील आतीफ इरफान शेख (वय 10) हा मुलगा कचरा टाकण्यासाठी बाहेर गेला असता पाय घसरून नदीत पडला. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी नदीपात्रात आढळून आला. भिवंडीतील चाविंद्र गावाजवळही आणखी एक दुर्घटना घडली. गुलजारनगर येथील मोहम्मद गौस नफीस अन्सारी (वय 17) हा मित्रांसोबत कामवारी नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी पाण्यात उतरल्यावर प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो बुडाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

समुद्रात मच्छिमारांचा बोट उलटली

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील दिघी किनाऱ्याजवळ मच्छिमारीसाठी गेलेल्या बोटीला भरतीच्या लाटांचा तडाखा बसून ती उलटली. या बोटीत असलेले हरिश्चंद्र नारायण भुणेश्वर, कृष्णा लखमा पाटील आणि प्रकाश पांडुरंग झेंगर हे तिघेही समुद्रात पडले. मात्र, जेटी बोट फेरीचालकांच्या तत्परतेमुळे त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह

गेल्या काही दिवसांतील या घटनांमुळे मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरी सुरक्षाव्यवस्था, धोकादायक झाडांची छाटणी, जलनिस्सारण व्यवस्था, उघड्या मॅनहोल्सचे संरक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT