Mumbai rain politics : मुसळधार पावसामुळे झालेल्या मुंबईच्या ‘तुंबई’वरून राजकारणही चांगलेच तापले.
पहिल्याच पावसामुळे मुंबईत दाणादाण झाल्याने शिवसेना ठाकरे आणि काँग्रेसकडून भाजपला कोंडीत पकडले. तर गेली 25 वर्षे महापालिकेत सत्तेत असताना तुम्ही काय केले? असा उलटवार भाजपने केला.
सोमवारच्या मुसळधार पावसाने मुंबईतील (Mumbai) अनेक भागात पावसाचं पाणी शिरलं होतं. आमदार आदित्य ठाकरे यांनी या परिस्थितीची पावसात मुंबईची पाहणी केली. हिंदमातासह मुंबईतील अनेक भागांचा दौरा केला. या वेळी त्यांनी महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारने मॉन्सूनपूर्व काहीही तयारी नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
‘हिंदमाता परिसरासाठी भूमिगत टाक्या बांधल्यानंतर गेल्या दोन वर्षांत हिंदमाता आणि गांधी मार्केट परिसरात पाणी भरले नव्हते, अंधेरी 'सब-वे' देखील आम्ही पूरमुक्त केला होता; यंदा मात्र या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पूर्वतयारी न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे, ’ असा आरोप आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला.
एका पावसात मुंबई तर बुडालीच, पण मेट्रो भुयारी मार्गात पाणी शिरल्याने भ्रष्टाचार उघड झाला. तीन वर्षे मुंबई महापालिका भाजप आणि मिंधे टोळीच्या हातात आहे. जनतेच्या पैशांची या काळात फक्त लूट झाली. त्याचा समाचार आम्ही घेऊच, पण आज माझे शिवसैनिकांना आवाहन आहे, ते म्हणजे रस्त्यावर उतरा आणि लोकांना मदतीचा हात द्या, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
दुसरीकडे काँग्रेसनेही भाजपच्या कारभाराला चांगलेच टार्गेट केले. ‘महाभ्रष्ट भाजप महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई बुडवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले,’ असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
धारावी, सायन, हिंदमाता, अंधेरी सबवे, चेंबूर या भागांत पाणी साचले. रेल्वे ट्रॅक व भुयारी मेट्रो स्थानकांमध्येही पाणी साचून प्रशासनाची तयारी किती फोल आहे हे दिसले. प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेचा कारभार सुरू असून, या सरकारच्या बेलगाम भ्रष्टाचाराचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच शहरातील नालेसफाईची पाहणी आम्ही केली होती. अनेक भागांत गाळ काढण्याचे काम झालेले नाही. काही भागांत गाळ काढून तसेच ढीग पडून आहेत. जे काम झाले आहे तेही व्यवस्थित झालेले नाही. नालेसफाई व रस्ते काँक्रीटीकरण कामातून मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये पाण्यात घालणाऱ्यांची एसीबीमार्फत चौकशी करा, अशी मागणी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष मंत्री आशीष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केला. मुंबईत गेल्या 25 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या शिवसेना ठाकरे अन् कंत्राटदारांनी मुंबईला लुटल्याचा आरोप आमदार शेलार यांनी केला. मुंबईच्या रस्त्यांवर महापालिकेने खर्च केलेले तीन लाख कोटी रुपये शिवसेना ठाकरेंनी लुटले. ब्रिमस्टोवाड प्रकल्पाचे कामही त्यांनी पूर्ण केले नाही. मिठी नदीच्या स्वच्छतेच्या नावावर एक हजार कोटी रुपये लाटले. जेव्हा मेमध्ये मी तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाल्याच्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी करत होतो; तेव्हा ठाकरेंच्या पक्षाचे नेते कुठे होते, असा सवालही त्यांनी केला.
मुंबईत सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत आहे. पालिकेचे तब्बल सहा हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी वर्ग विविध ठिकाणी उपस्थित असून, सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. पालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून पालिका आयुक्त भूषण गगराणी सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.