Thane Politics : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाने ठाणे जिल्ह्यात पक्षवाढीचे जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. याच प्रयत्नात एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा अभेद्य गड समजल्या जाणाऱ्या कळव्यात 'सर्जिकल स्ट्राइक' करत ऑपरेशन 'धनुष्यबाण' यशस्वी केले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सात माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.
आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, मनिषा साळवी, प्रमिला केणी, माजी नगरसेविका आणि ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, सचिन म्हात्रे, युवानेते मंदार केणी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळल्याने आव्हाड यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभेत जोरदार यश संपादन केल्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य निवडणुकांत स्वबळाचा नारा देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 30 वर्षापासून ठाणे महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण यावेळी भाजपनेही इथे कमळ फुलवण्याचा निश्चय केला आहे. मंत्री गणेश नाईक, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार संजय केळकर या तिघांनी त्यासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. त्यासाठी भाजपने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काही माजी नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू होती.
भाजपचा रथ रोखण्यासाठी आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत्या. पण शिवसेनेने आव्हाडांनाच धक्का दिला आहे. कळवा उपशहरात 2017 मध्ये पालिका निवडणुकीत एकट्या कळवा- मुंब्रा भागातून 40 नगरसेवकांचे बलाबल होते. नवीन प्रभाग रचनेनुसार ही संख्या 45 होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणूनच एकगठ्ठा नगरसेवकांची शिदोरी आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चुरस निर्माण झाली होती. पण या चुरशीत शिवसेनेने बाजी मारली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.