मुंबई : कॉग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्याबाबत आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा (Hemant Biswa Sharma)यांनी एका प्रचारसभेत वादग्रस्त विधान केलं आहे. या विधानावरुन कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. पटोले हे माध्यमांशी बोलत होते. ''हेमंत बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे,'' असा असा हल्लाबोल पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले म्हणाले, ''हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुलजी गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे.''
''हेमंत बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत, बोलताना काही ताळतंत्र बाळगण्याची आवश्यकता असते मात्र त्यांच्यावरचे संस्कारच तसे आहेत, देव त्यांना सदबुद्धी देवो हीच आमची सदिच्छा. हेमंत बिस्वा शर्मा यांनी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घ्यावेत त्यांचा सर्व खर्च काँग्रेस पक्ष करेल, असा टोमणाही पटोले यांनी मारला.'
''लोकशाहीमध्ये सरकारला जाब विचारण्याचा अधिकार विरोधी पक्षाला आहे त्यामुळे एक जबाबदार विरोधीपक्ष यानात्याने राहुलजी गांधी यांनी सरकारला जाब विचारला. भाजपाने त्यावर आकांडतांडव करण्याची काही गरज नाही परंतु भाजपा हा लोकशाही व संविधानाला मानत नाही. भाजपाचे नेते हीन पातळीवरून विरोधकांना बदनाम करण्याचे काम करत असतात,'' असे पटोल यांनी सांगितले.
''शर्मा यांचे वक्तव्य अत्यंत अश्लाघ्य व सर्व मर्यादा पार करणारे आहे. राहुलजी गांधी यांच्याबद्दल त्यांनी काढलेले वक्तव्य हे त्यांची पातळी दाखवून देणारे आहे. भाजपातील वरिष्ठ नेत्यांपासून अनेक नेत्यांना विरोधकांवर अशी वैयक्तिक टीका करुन त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा रोग जडला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनियाजी गांधी, प्रियंकाजी गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्याबद्दलही हीनदर्जाचा शब्दप्रयोग भाजपा नेत्यांनी वारंवार केला आहे. त्यांची हीच संस्कृती आहे मात्र काँग्रेसची ही संस्कृती नाही," अशा शब्दात पटोले यांनी सुनावले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.