Nana Patole, Narendra Modi
Nana Patole, Narendra Modi sarkarnama
मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक चुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पाच वर्षापूर्वी आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अविचारीपणे घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचे प्राण गेले, लाखो उद्योगधंदे बंद झाले. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटल्याप्रमाणे नोटाबंदी ही संघटीत लूट असून यामुळे जीडीपीत मोठी घसरण होईल हे आता सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या या ऐतिहासिक घोडचुकीसाठी देशाची माफी मागून प्रायश्चित्त करावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

पटोले म्हणाले की, पाच वर्षापूर्वी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अविचारीपणे निर्णय घेऊन हुकुमशहाप्रमाणे देशावर नोटबंदी लादली. त्या काळा दिवसाला आज ५ वर्ष झाली आहेत. हा निर्णय घेताना नोटाबंदीमुळे काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद, बनावट चलनी नोटा संपतील, अशा थापा मारून देशाची दिशाभूल केली होती. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे उद्योग व्यवसाय छोटे व्यापारी आणि रोजगार संपले आणि देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्याचे आपण सर्व पहात आहोत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. देशाचा जीडीपी निचांकी पातळीवर पोहोचला. अनौपचारीक क्षेत्राची अवस्था बिकट झाली आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे.

नोटाबंदीमुळे देशातील जनतेला प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ५० दिवसांत सारे काही आलबेल होईल. त्याला आता पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, देशाची अर्थव्यवस्था आणि सामान्य माणूस यातून सावरला नाही. नोटाबंदीचे जे उद्देश पंतप्रधानांनी सांगितले होते. त्यातला एकही सफल झाला नाही. उलट अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्यामुळेच भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आता याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. देशात काहीही चांगले झाले तरी आपल्यामुळेच झाले असे सांगून प्रत्येक गोष्टींचे भांडवल करून श्रेय लाटणा-या मोदींनी आपल्या घोडचुकीबद्दल देशाच्या जनतेची माफी मागावी, असे पटोले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT