Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole News : 'मराठा Vs ओबीसी वाद पेटवून शिंदे, फडणवीस...' ; नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

Mayur Ratnaparkhe

Maratha and OBC Reservation : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाणीवपूर्वक मराठा व ओबीसी वाद निर्माण करून, दोन्ही समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत. छगन भुजबळ हे आपण राजीनामा दिल्याचे सांगत आहेत, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र याबाबत काहीच बोलत नाहीत.' असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

याचबरोबर 'महाराष्ट्रात सध्या महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून शिंदे फडणवीस आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत हे स्पष्ट आहे.' असंही पटोलेंनी(Nana Patole) म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, 'राज्यातील अनैतिक व असंवैधानिक सरकारने सत्तेत येताना संविधानाला पायदळी तुडवून लोकशाहीला काळीमा फासला आणि आता सत्तेत आल्यापासून राज्यातील सामाजिक समतोल बिघडवून, मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण केला जात आहे. मंत्री छगन भुजबळ म्हणतात मी 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि त्यानंतरच ओबीसी आरक्षण बचावासाठी मेळावे सुरु केले आणि सोबतच ते म्हणतात राजीनाम्याबाबत वाच्यता न करण्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. म्हणजे भुजबळांचे बोलविते धनी सरकारच आहे.'

'भुजबळ(Chhagan Bhujbal) ओबीसींच्या बाजूने बोलत असल्याचे दाखवत आहेत आणि शिंदे गटाचे आमदार भुजबळांच्या विरोधात बोलत आहेत. ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री कोणीही यांना रोखत नाही. उलट त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यात मराठा ओबीसी समाजात भांडणे लावण्याचे काम सरकारच करत आहे. हे आम्ही सातत्याने सांगत आलो आहोत, आज त्याला पुष्टी मिळत आहे.

या सगळ्या वादामध्ये आणि चिखलफेकीमध्ये महागाई, बेरोजगारी, सरकारी नोकर भरतीमधील घोटाळे, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या याबद्दल सरकार चकार शब्द काढत नाही. किंबहुना या मूळ मुद्द्यावरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी सरकारनेच हा वाद सुरु केला आहे.' असा आरोप पटोले यांनी केला आहे.

'मराठा समाजाला आरक्षण देण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती पूर्ण केली, असे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व तमाम शिवप्रेमी जनतेचा घोर अपमान केला आहे. सत्तेसाठी, खुर्चीसाठी छत्रपतींचा वारंवार अपमान केला जात आहे. शिंदे-भाजपा सरकार मराठा व ओबीसी समाज या दोघांनाही फसवत आहेत. पण महाराष्ट्राची जनता दुधखुळी नाही, आरक्षणाच्या नावावर लोकांची डोकी फोडू नका, महाराष्ट्र पेटवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते जनतेने यशस्वी होऊ दिले नाहीत.

आता आरक्षणाचा वाद पेटवून गावखेड्यातील वातावरणही दुषित करण्याचे पाप केले जात आहे. राजकीय स्वार्थासाठी सामाजिक शांतता बिघडवणाऱ्या शिंदे-भाजप व अजित पवार सरकारला जनता कदापी माफ करणार नाही.' असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT