BJP MLA Narendra Mehta School Seven Eleven School Sarkarnama
मुंबई

Narendra Mehta: भाजप आमदाराला मोठा दणका; शिक्षण विभागाकडून कारवाईला सुरुवात, काय म्हटलंय नोटीसमध्ये?

BJP MLA Narendra Mehta School Seven Eleven School: ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Mangesh Mahale

ठाणे: मिरा रोड येथील भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन शाळेतील विद्यार्थ्यांच्या डब्याबाबत काढलेल्या फतव्याबाबत आता शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी सेव्हन इलेव्हन शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर धार्मिक कारणांवरून निर्बंध घालणे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव निर्माण होणे, हे बालकांच्या हक्कांशी संबंधित तरतुदींशी विसंगत ठरू शकते, असे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.

शिक्षण विभागाने शाळेला दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेचा खुलासा समाधानकारक नसल्यास शालेय संहिता तसेच बालकांच्या हक्कांशी संबंधित कायद्यांनुसार कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.

मिरा रोड पूर्वेकडील सेव्हन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पर्युषण काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे पदार्थ आणू नयेत, असे आवाहन केले होते. यानंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. शाळेच्या भूमिकेविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता.

जैन धर्मात पर्युषण काळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर शाळेकडून विद्यार्थ्यांनी कांदा, लसूण, बीट आदी पदार्थ खाऊ नयेत किंवा ते डब्यात आणू नयेत, असे आवाहन पालकांना करण्यात आले होते. शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मोबाईलवर हे संदेश पाठवण्यात आले होते.

या सूचनेवरून पालक तसेच मनसेकडून आक्षेप घेतल्यानंतर प्रकरणाला व्यापक स्वरूप आले. शाळेच्या भूमिकेवर राज्यभरातून टीका होऊ लागल्यानंतर ठाणे जिल्हा शिक्षण विभागाने या प्रकरणाची दखल घेतली. त्यानंतर शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. आता शाळा प्रशासन या नोटिशीला काय उत्तर देते आणि शिक्षण विभागाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT