Sanjay Raut, Narendra Modi, Jarnge Patil Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : जरांगे-पाटलांचा राजकीय वापर; पंतप्रधान मोदी सावरकरांना विसरले..!

Bhagyashree Pradhan

Dombivli Political News :

अयोध्येतील रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे आणि इकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई धडक मोर्चाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना डिवचलं आहे.

'जरांगेंचा राजकीय प्यादे म्हणून वापर'

महाराष्ट्रात भविष्यात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुढला काळ अत्यंत गंभीर वाटत आहे. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे-पाटील (Maratha Reservation) यांच्याकडे राजकीय प्यादे म्हणून बघत आहेत. आणि राज्यातील सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे-पाटील यांच्याशी तातडीने सकारात्मक चर्चा होऊन ती निर्णयापर्यंत पोहोचायला हवी, अशी आमची भूमिका असल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.

'पंतप्रधान सावरकरांना विसरले'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 12 जानेवारीला नाशिकमध्ये होते. ते काळाराम मंदिरात गेले, प्रचार केला, शोभायात्रा काढली. पण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांची आठवण झाली नाही. इतकेच नाही तर पंतप्रधानांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचीही आठवण झाली नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे.

पंतप्रधान काळाराम मंदिरात गेल्यानंतरही त्यांना सावरकर आठवले नाहीत. सावरकरांचे स्मारक आहे तिथे गेले नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचा घणाघात राऊतांनी केला. नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबिर असून आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करू, अशी माहिती राऊतांनी दिली. केले. तसेच या मेळाव्यात आमच्या पक्षाची दिशा आणि रणनीतीवर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शंकराचार्य बनण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांचा हा अवतार पाहिला मिळत आहे. निवडणुकीनंतर त्यांचा वेगळाच अवतार पाहिला मिळेल , असे सांगत मोदी हे विष्णूचा तेरावा अवतार असल्याचे म्हणत त्यांच्या अंधभक्तांनी आधीच त्यांना देवपण दिले आहे, अशी उपरोधिक टीका राऊतांनी केली.

केजरीवाल, सोरेन यांच्यावर दबाव

'इंडिया' आघाडीतून बाहेर पडा, असा दबाव अनेक नेत्यावर आहे, असा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला. त्यासाठी कारवाईचा बडगा उगारला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, यांच्यावर 'इंडिया' आघाडीतून बाहेर पाडण्यासाठी दबाव आहे.

शिवसेनेकडे अनेक प्रमुख लोक जे आमचे उमेदवार होऊ शकतात त्यांच्यावरही दबाव आहे. पण या सगळ्याला न जुमानता शिवसेना पुढे जाईल आणि संघर्ष करेल. त्यासाठीच नाशिकचे अधिवेशन हे मैलाचा दगड ठरेल, असा दावा राऊतांनी केला.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT