Narendra Modi, Fake social Media Account Sarkarnama
मुंबई

Narendra Modi : सोशल मीडियावर मोदींच्या नावाने 'बनवेगिरी'

Bhagyashree Pradhan

Dombivli Political News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोशल मीडियावर मोठा बोलबाला आहे. भाजपकडून सोशल मीडियावर कायम प्रचाराचा धुमधडाका सुरू असतो. असे असले तरी आता भाजपच्या या गोष्टीचा गैरवापर अनेकजण करत आहेत.

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर जवळपास 50 हून अधिक बनावट अकाउंट इंस्टाग्रामवर दिसून येत आहेत. 'फिर एक बार मोदी सरकार' या नावाने जवळपास 20 बनावट अकाउंट दिसून येत आहेत. भाजपचे फॅन पेज जवळपास 15 ते 20 आहेत.

सध्या 'फिर एक बार मोदी सरकार' या नावाने सुरू असलेल्या एका बनावट अकाऊंटचे (Fake Social Media Account) तब्बल 1 मिलियन फॉलोअर्स असून या अकाऊंटवर स्कॅन कोड देखील दिला आहे. मोदींना पाठिंबा द्या आणि प्रमाणपत्र मिळवा, असे आवाहन फेसबुक आणि इंस्टाग्राम या दोन्ही सोशल मीडियाच्या अकाऊंटद्वारे करण्यात आले आहे. असे असले तरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे आमचे खरे अकाउंट नसल्याचे स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी आणि सोशल मीडिया

नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यावेळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रचाराला सुरुवात केली होती. त्यानंतरही त्यांनी सोशल मीडियार तेवढ्याच जोमाने प्रचार सुरू ठेवला.

भाजपने (BJP) देखील मोदींचे दौरे, अनेक योजना, पंतप्रधान मोदी यांनी काय काम केले आहे त्या संदर्भातील सर्व माहिती सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लक्षद्वीपचा दौरा सोशल मीडियातून लोकांपर्यंत पोहोचला आणि लक्षद्वीप मोहीम नव्याने सुरू झाली. यावेळी देखील तरुण पिढी नरेंद्र मोदी यांच्याकडे अधिक आकर्षित झालेली पाहायला मिळाली.

मोदींच्या नावावर बनावट अकाऊंट

नरेंद्र मोदी यांची सोशल मीडियावर मोठी क्रेझ पाहायला मिळते. त्यांनी घातलेले मोदी जॅकेट सुरुवातीलाच प्रसिद्ध झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या छोट्या छोट्या गोष्टी देखील समाज माध्यमावर व्हायरल करतात. म्हणूनच इंस्टाग्राम (Instagram) तसेच फेसबुकवर (Facebook) त्यांच्या नावाने अनेक बनावट अकाउंट तयार करण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

फिर एक बार मोदी सरकार...

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना भाजपतर्फे 'फिर एक बार मोदी सरकार' अशी घोषणा देण्यात येत आहे. या घोषणेतूनच 'फिर एक बार मोदी सरकार' या नावाने अनेक बनावट अकाउंट तयार करण्यात आले आहेत.

यातील एका अकाउंटवर एक मिलियन फॉलोवर्स आहेत. विशेष म्हणजे या अकाउंटवर काँग्रेसच्या नेत्यासंदर्भातील मिम्स देखील व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या अकाऊंटवर मोदींना पाठिंबा देण्याची शपथ घ्या आणि प्रमाणपत्र मिळवा असे आवाहन केले आहे.

यासाठी तुमचा फोन नंबर घेतला जातो. असे असले तरी कुणीही फोन नंबर किंवा स्वतःची माहिती कोणत्याही अकाउंटवर देऊ नये, त्यातून फसवणूक होऊ शकते, असे आवाहन भाजप आणि पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

हे तर बनावट अकाऊंट

हे भाजपचे खरे अकाऊंट नाही, अशी माहिती भाजपच्या सोशल मीडिया हँडलचे डोंबिवलीचे पदाधिकारी आशिष पावसकर यांनी दिली. अशा कोणत्याही अकाऊंटवर जाऊन स्वतःची माहिती देऊ नये, असे आवाहन देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

फेक अकाऊंटचा सुळसुळाट

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या आणि विविध पक्षांच्या नावे बनावट अकाऊंट तयार केली जातील. मात्र कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सोशल मीडियावरील अशा कोणत्याही अकाऊंटवरून पोस्टला लाईक, शेअर किंवा आपली स्वतःची माहिती देऊ नये, असे आवाहन डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी केले आहे.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT