Navi Mumbai News : Sarkarnama
मुंबई

Navi Mumbai News : अखेर अंतिम फैसला झाला; नवी मुंबई महापालिकेत 'त्या' 14 गावांचा समावेश!

Eknath Shinde News : मुख्यमंत्र्यांचा ऐतिहासिक फैसला, ग्रामस्थांमध्ये आनंद..

शर्मिला वाळुंज

Navi Mumbai News : नवी मुंबई मुंबईपालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आलेली 14 गावे पुन्हा एकदा पालिकेच्या हद्दीत समाविष्ट केले आहेत. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. मागील काळापासून हा निर्णय प्रलंबित होता. दीड वर्षांपूर्वा याबाबतची अधिसुचना काढून देखील अंतिम याबाबत ठोस काही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता होती. अखेर याचा निर्णय झाल्याने आता ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आलेल्या या १४ गावांना पालिकेच्या हद्दीत आणण्यासाठी सर्वच पक्षांच्या विकास समिती प्रयत्नशील होती. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनी यात पुढाकार घेतला होता. सप्टेंबर 2022 मध्ये ही गावे पालिका हद्दीत आणण्यासाठी अधिसुचना काढण्यात आली. मात्र दीड वर्षांनंतरही याचा निर्णय होत नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी कल्याण डोबिवली, उल्हासनगरसह नवी मुंबईतील 14 गावांचा आढावाबाबत बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार डॉ. बालाजी कल्याणकर, आमदार राजू पाटील यांच्यासह विविध विभागांचे सचिवदेखील उपस्थित होते.

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीतील 27 गावातल्या नागरिकांना 2017 च्या नियमानुसार कर अदा करण्याचा महत्त्वपूर्ण दिलासा देण्यचा निर्णय झाला. 14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत हद्दीत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. उल्हासनगर मधील अनधिकृत बांधकामांबाबत येत्या मंत्रिमंडळात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

याविषयी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, 14 गावांन मध्ये जे भूमीपूत्र आहेत गावकरी रहिवाशी आहेत यांची मागणी होती 14 गावांचा समावेश नवी मुबंई महानगरपालिके मध्ये केला पाहिजे. आज तसा निर्णय मुख्यमंत्री यांनी त्याठिकाणी घेतला. त्याचा जीआर, नोटिफिकेशन देखील यावेळी काढण्यात आले आहे. आणि 14 गाव नवी मुबंई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेतले आहे. आता त्याठिकाणी डेव्हलपमेंट ही नवी मुबंई मध्ये जश्या प्रकारे होते तशीच 14 गावांमध्ये देखील होईल.

तर स्थानिक आमदार राजू पाटील म्हणाले, नवी मुंबई महानगरपालिकेत प्रवेशासाठी कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 14 गावांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर सहा वेळा बहिष्कार टाकला होता. मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर 14 गाव विकास समितीला सोबत घेऊन अनेक वेळा पाठपुरावा करून अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यावेळी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 गावं नवी मुंबई मनपात समाविष्ट करण्याची घोषणा केली होती. मात्र काही तांत्रिक अडचणी येत असल्याने शासनाची अधिसूचना निघाली नव्हती. यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने गाव नवी मुंबईत समाविष्ट करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. 14 गावांच्या एकजुटीचा खऱ्या अर्थाने आज विजय झाला आहे. मी 14 गाव सर्व पक्षीय विकास समितीचे,नागरीकांचे अभिनंदन आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.

मालमत्ता कराचा प्रश्न मार्गी -

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांमध्ये मालमत्ता कराचा विषय प्रलंबित होता. त्यावर मार्ग काढत 2017 च्या दराप्रमाणे आता कराची आकारणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या गावातील जी अनधिकृत बांधकामे आहेत ती संरक्षीत करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. नवी मुंबई महापालिका हद्दीत 14 गावांचा समावेश करण्याची भूमिपुत्रांची मागणी मान्य केली असून त्याबाबत अधिसूचना काढण्यात आली आहे. आता या गावांमध्ये नवी मुंबई महापालिकेप्रमाणे विकास कामे होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) व्यक्त केला.

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे -

उल्हासनगर येथील अनधिकृत बांधकामे नियमाकुल करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. जीर्ण झालेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याबाबतचा निर्णय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वास्तविशारद संघटनेची देखील यावेळी बैठक घेण्यात आली. त्यानुसार ठाण्याच्या धर्तीवर इमारतींच्या उंचीबाबतचा नियम कल्याण डोंबिवली हद्दीत देखील लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील टेकडीवर संत सावळराम स्मारकासाठी जागा देण्याचा निर्णय झाला असून त्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

अखेर आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha) पार्श्वभूमीवर हे निर्णय जाहीर झाले असून आता सत्तेची समिकरण कशी बदलतात हे पहावे लागेल.

नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करावयाच्या गावे -

दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बाम्मली, नारीवली, बाळे, नागांव, भंडार्ली, उत्तर शीव, गोठेघर.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT