Navneet Rana | Ravi Rana
Navneet Rana | Ravi Rana Sarkarnama
मुंबई

राणांचा जामिनासाठी जोरदार युक्तिवाद : "मी 'मातोश्री'वर गेलोच नाही तरी गुन्हा कसा काय?"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे सध्या दोघांचाही मुक्काम तुरुंगातच आहे. या दरम्यान त्यांनी जामिन मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र, न्यायालयाने दोनवेळा सुनावणी पुढे ढकलली होती. त्यामुळे दोघांनाही मागील पुर्ण आठवडा कारागृहात काढावा लागला आहे. त्यानंतर आता आज या जामिन अर्जावर सुनावणी पार पडत असून जामिन मिळविण्यासाठी राणा यांच्याकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. आपण मातोश्रीवर गेलोच नाही तरी गुन्हा कसा काय असा सवाल त्यांनी विचारला आहे.

आज पार पडलेल्या सुनावणीत राणा दाम्पत्याच्या वतीने वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. जो गुन्हा केलेलाच नाही त्यासाठी राणा दाम्पत्यांना ८ दिवस तुरुंगात रहावे लागले आहे. हा गुन्हा मनी लाॅंड्रींगचा नाही, केवळ आयडियातून हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. यात कुठलिही कायदेशीर प्रक्रिया न पाळता कारवाई केली, असा दावा करण्यात आला.

वकील म्हणाले, हनुमान चालिसाचे पठण करण्याचे आवाहन केले ते मातोश्री बंगल्याबाहेर, जे मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान नाही. शिवाय दोघेही जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. यात एक आमदार, तर एक खासदार आहेत. दोघांनीही पोलिसांनी बाजावलेल्या १४९ च्या नोटीसीचा मान राखला, घराबाहेरही पडले नाहीत. त्यामुळे दोघांनी कोणताही गुन्हा केलेला नाही असा युक्तिवाद करण्यात आला.

यानंतर रवि राणा म्हणाले, हनुमान चालिसा वाचून आम्ही मातोश्रीचा अपमान करत नव्हतो. मात्र शिवसैनिकांनी आव्हान देत, आम्ही जाऊ देणार नाही असे म्हणून गर्दी केली होती. आम्ही पूर्णतः शांततेच्या मार्गाने हनुमान चालिसा पठण करणार होतो, जसे मुन्ना भाई चित्रपटात गुलाब देऊन चुकीची जाणीव केली गेल्याचे दृश्य दाखवले अगदी त्या प्रमाणे सरकारला त्यांच्या चुकीच्या निर्णयाची जाणीव करून देण्याचा आमचा प्रयत्न होता.

नागरिक परदेशात हनुमान चालिसा वाचत आहेत. नुकतीच लंडन ब्रिजवरही हनुमान चालिसा वाचण्यात आली. मात्र इथे फक्त घोषणा केली आणि दोघांना ७ दिवस कारागृहात जावे लागले. फक्त १४९ ची नोटीस पाळली नाही म्हणून देश द्रोहाच कलम कसं काय लागू शकते. त्यादिवशी दुपारी ३.४० मिनीटांनी आम्ही मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणचा कार्यक्रम रद्द केला, मग कुठे उल्लंघन झालं?

आम्ही केलेल्या वक्तव्यानंतर जमा झालेले नागरिक हे सरकारच्या विरोधात नव्हे तर सरकारच्या बाजूने होते. नागरिकाला सरकारच्या विरोधात वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. फक्त त्या वक्तव्यामुळे हिंसा झाली तर कारवाई करण्याचा सरकारचा अधिकार आहे. पण इथे आम्ही हिंसा केली नव्हती. आम्ही तिकडे हिंसा करायला जाणार नव्हतो. आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला तेथे बोलवले नव्हते. तसेच पोलिसांच्या १४९ नोटीस नंतर आम्ही जाणंही टाळलं मग आम्ही गुन्हाच केला नाही तर गुन्हा कसा दाखल केला गेला?

नुसता गुन्हा नाहीतर राजद्रोहचं कलमही त्यात लावण्यात आलं. मी गेलो नाही, फक्त जाणार आहे असं म्हटलं होतं. मी कोणत्याही गुन्ह्याबद्दल बोललो, पण म्हणून तोपर्यंत तो गुन्हा होत नाही. अमन कुमार खटल्यात बलात्काराचा विचार केला तर त्याला पकडून अटक करून शिक्षा होऊ शकत नाही, असे सांगितले आहे. कोणत्याही गुन्ह्याची तयारी करणे हा आयपीसीच्या फक्त दोन कलमांतर्गत गुन्हा आहे, म्हणजे १२२ आणि २९९. पण इथे मी कसलीही तयारी करत नव्हतो, ना मातोश्रीवर गेलो होतो, असाही राणा यांच्याबाजूने युक्तीवाद करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT